मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक आणि अतिसंवेदनशील ताज महाल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने रविवारी मध्यरात्री एकच खळबळ उडाली. “दाऊद इब्राहिमने ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे,” असा दावा करणारा निनावी फोन आल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाली. मात्र, अनेक तास चाललेल्या कसून तपासणीनंतर कोणतेही स्फोटक अथवा संशयास्पद साहित्य आढळून आले नसल्याने ही धमकी अफवा असल्याचे स्पष्ट झाले. (Taj Hotel Bomb Threat)
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १२.१३ वाजता नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ताज हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याची माहिती दिली. या कॉलमध्ये कुख्यात फरार गुन्हेगार दाऊद इब्राहिमचे नाव घेतल्याने पोलिसांनी या इशाऱ्याकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले. त्यानंतर ही माहिती तात्काळ मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. (Taj Hotel Bomb Threat)
सूचना मिळताच कुलाबा पोलीस, गुन्हे प्रकटीकरण शाखा, बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तसेच इतर सुरक्षा यंत्रणा ताज हॉटेलमध्ये दाखल झाल्या. हॉटेलची मुख्य लॉबी, रेस्टॉरंट्स, बँक्वेट हॉल, स्विमिंग पूल, पार्किंग, बाहेरील परिसर आणि इतर संवेदनशील भागांची बारकाईने तपासणी करण्यात आली. संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. (Taj Hotel Bomb Threat)
https://prahaar.in/2026/07/12/iran-us-war-strait-of-hormuz-closed-again-irans-decision-sparks-a-stir-trump-furious/
दीर्घ तपासणीनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू, स्फोटक किंवा घातपाताचा पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी ही धमकी खोटी असल्याचे स्पष्ट केले. तथापि, अशा प्रकारची धमकी देणाऱ्याला शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी तपास सुरू ठेवण्यात आला आहे. (Taj Hotel Bomb Threat)
तांत्रिक तपासादरम्यान हा फोन नवी मुंबईतील तुर्भे परिसरातून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी कॉलसाठी वापरण्यात आलेला मोबाईल क्रमांक शोधून काढला असून, तुर्भे पोलिसांच्या मदतीने संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे. कॉल करणाऱ्याचा उद्देश काय होता आणि त्यामागे आणखी कोणी आहे का, याचाही तपास सुरू आहे. (Taj Hotel Bomb Threat)
https://prahaar.in/2026/07/12/moshi-building-collapse-tragedy-strikes-moshi-9-dead-in-the-incident-search-for-one-person-still-underway/
विशेष म्हणजे, २००८ च्या २६/११ दहशतवादी हल्ल्यांमध्ये ताज हॉटेल हे प्रमुख लक्ष्य ठरले होते. त्यामुळे या हॉटेलला मिळणारी कोणतीही धमकी सुरक्षा यंत्रणांसाठी अत्यंत संवेदनशील आणि गंभीर मानली जाते. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोणताही धोका पत्करला नाही आणि तातडीने संपूर्ण परिसराची सखोल तपासणी केली. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, अशा प्रकारचे खोटे धमकीचे फोन करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Taj Hotel Bomb Threat)