Home संपादकीय अग्रलेख मेहनतीशिवाय यश नाही

मेहनतीशिवाय यश नाही

0
मेहनतीशिवाय यश नाही
student

विद्यार्थ्यांचे यश केवळ परीक्षेतील गुणांवर अवलंबून नसून आत्मविश्वास, नियमित अभ्यास, योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यावरही तेवढेच अवलंबून असते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच सातत्यपूर्ण मेहनत, पालक-शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध दिनचर्या अंगीकारल्यास प्रत्येक विद्यार्थी यशाचे शिखर गाठू शकतो.

उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरू होऊन आजचा तेरावा दिवस आहे. विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होणे आवश्यक आहे. तरच तो विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी त्यांच्या मनात स्वत:चा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. तो आत्मविश्वास पालक आणि शिक्षकवर्गांने निर्माण करायला हवा. विद्यार्थ्यांच्या जीवनात पालक आणि शिक्षक अधिक जवळचे असतात. त्यामुळे त्यांची आवडनिवड व सवय त्यांना माहीत असते. बरेच विद्यार्थी परीक्षेपर्यंत बेसावध असतात. परीक्षा जवळ आली की, रात्रीचा दिवस करून अभ्यासाला लागतात. याचा परिणाम विद्यार्थ्यांचे मन विचलित होते. पुढे काय करावे त्यांनाच समजत नाही. त्यांच्या मनावरील दडपण वाढते. याचा परिणाम त्याला कमी गुण किंवा त्या परीक्षेत अपशय येऊ शकते. यासाठी मुलांनी विद्यार्थी म्हणून यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत. तसेच अभ्यासामध्ये नियमित सातत्य ठेवावे लागेल. कठोर परिश्रम आणि अभ्यासात सातत्य ठेवण्यासाठी अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन करावे लागेल. त्यांनी या तीन गोष्टी पाळल्या, तर परीक्षेत उत्तम गुण मिळू शकतात.

https://prahaar.in/2026/06/27/water-scarcity-on-raigad-fort-will-be-resolved/

आपण सहज परीक्षेत यश संपादन करू शकतो असे जरी विद्यार्थ्यांना वाटत असले तरी तितके ते सोपे नसते. मुळात त्याला शिकण्याची आवड पाहिजे. म्हणजे तो पुढे काहीतरी करू शकतो. खरे म्हणजे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्यावर पहिल्या सुरुवातीपासून विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागावे. शाळेमध्ये ज्या धड्याचे अध्ययन झालेले असेल त्याची घरी आल्यावर उजळणी करावी. त्या आधी पूर्ण धडा वाचावा म्हणजे आपण त्या धड्यात काय शिकणार आहोत याची कल्पना येते. त्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करावे लागेल. त्याप्रमाणे रोज अभ्यास करावा म्हणजे अभ्यास करण्याची सवय लागते. तसेच विद्यार्थ्यांनी विषयांचे वेळापत्रक तयार करून अभ्यास करावा. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात ताणतणाव वाढत नाही. परीक्षेच्या वेळी अधिक उत्साहाने जातात.

https://prahaar.in/2026/06/27/us-iran-war-us-iran-conflict-flares-up-again-us-launches-airstrikes-on-39-locations-irgc-retaliates-against-us-bases-in-the-gulf/

आपण एक विद्यार्थी आहोत याची जाणीव त्यांना असायला हवी. शाळेची वेळ, घरातील इतर कामे आणि मोकळा वेळ गृहीत धरून विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करावे लागेल. म्हणजे विषयांचे वेळापत्रक तयार करून दर दिवशी दिलेल्या वेळेनुसार अभ्यास करावा लागेल. या पद्धतीमुळे अभ्यासात सातत्य राहील. अभ्यास नियमितपणे केला जाईल. असे जरी असले तरी अवांतर वाचनसुद्धा अतिशय महत्त्वाचे असते. शाळेमध्ये शिक्षक अध्यापन करीत असताना लक्षपूर्वक ऐकावे. त्यातल्या काही आवश्यक मुद्द्यांचे टिपण करावे. काही शंका असल्यास बिनधास्तपणे अध्यापकांना विचाराव्यात. चुकीचे समजून घेऊ नये. यात आपलेच नुकसान आहे. म्हणजे अध्यापक वर्गात अध्ययन करीत असताना विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे. बऱ्याच वेळा धड्याखाली जे प्रश्न विचारलेले असतात तेच प्रश्न परीक्षेच्या वेळी विचारले जातात. तेव्हा त्या प्रश्नांची जी अचूक उत्तरे असतील त्याची नियमित उजळणी करणे गरजेचे असते. तसेच जे प्रश्न दिलेले असतील त्या उत्तरांची सुद्धा उजळणी व्हायला हवी. दुर्लक्ष केल्यास परीक्षेच्या वेळी जर तो प्रश्न विचारला गेल्यास अचूक उत्तर आपण लिहू शकत नाही. तेव्हा विषयाचे अध्ययन जरी झाले तरी प्रश्नांच्या उत्तरांची वेळच्यावेळी उजळणी करावी लागेल. म्हणजे परीक्षेला उत्तरे लिहिताना अडथळा येणार नाही. अधिक आत्मविश्वासाने परीक्षेची उत्तरपत्रिका सोडवू शकतो. हे सर्व नियमित अभ्यास आणि उजळणी केल्यामुळेच शक्य होऊ शकते.

https://prahaar.in/2026/06/27/tet-paper-leak-three-arrested-in-the-ted-paper-leak-case-police-picked-them-up-from-the-airport-area-and-the-investigation-is-underway/

विशेष म्हणजे प्रत्येक दिवशी सर्व विषयांची उजळणी करणे शक्य नसते. अशावेळी आपल्याला जो धडा कठीण वाटत असेल त्याचीच उजळणी करावी. म्हणजे पुढील धडा दुसऱ्या दिवशी घेता येतो. यासाठी आपले योग्य धेय्य असले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुरेशी झोप आणि सकस आहार दैनंदिन आहारात दिला पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे लक्ष केंद्रित होते. अन्यथा मन विचलित होऊ शकते. हा निसर्गाचा नियम आहे. याची काळजी सर्व पालकांनी घेतली पाहिजे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वतंत्र जागा पाहिजे. खेळती हवा, शांत वातावरण आणि पुरेसा प्रकाश असावा. अभ्यास करताना मध्येच थोडी विश्रांती घ्यावी. अभ्यासामध्ये काही शंका असल्यास शिक्षकांना विचारून वेळच्या वेळी शंकांचे निरसन करावे. हल्लीची मुले व्यसनाच्या आहारी गेलेली पाहायला मिळतात. हे टाळण्यासाठी योग्य वयात मुलांना व्यसनापासून सतर्क करणे गरजेचे आहे. संदेश देणे बंधनकारक आहे. तसेच सध्या टीव्ही बाजूला होऊन मोबाईलचा अतिरिक्त वापर होत आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तेव्हा योग्य कामासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर करावा. अन्यथा मोबाईलला चार हात दूर ठेवावे. प्रत्येकाच्या जीवनात कधी यश, कधी अपयश आहे. मात्र अपयशाने खचून न जाता त्यावर मात करून पुढे गेले पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा असेच करायला हवे. अपयशाने खचून न जाता आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा. यश आपलेच असते. यातूनच विद्यार्थी यशस्वी होत असतात.
__रवींद्र तांबे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here