Home अध्यात्म संत नामदेव

संत नामदेव

0
संत नामदेव
sant namdev

बाळ सगुण गुणाचं तान्हं गे
बाळ सगुण गुणाचं तान्हं गे।
बाळ दिसतं गोजिरवाणं गे।
काय सांगता गाऱ्हाणे गे ।
गोकुळचा नारी॥ श्रीरंग माझा बछडा गे।
यासी नाही दुजा जोडा गे।
तुम्ही संगत याची सोडा गे।
गोकुळच्या नारी ॥ नामा म्हणे यशोदेसी गे।
हा तुझा हृषीकेशी गे। किती छळतो आम्हांसी गे। गोकुळच्या नारी ॥ 

परमेश्वर हा निर्गुण निराकार असतो. वेदांनीही त्याचं वर्णन ‘नेति नेति’ असं केलं आहे. याच अधारण, स्वसंवेधाला व अरुपाला ज्ञानदेवांनी ओंकाररूपात वंदन केलं आहे. ईश्वर चराचराला व्यापून उरला आहे. पण भक्तावर कृपाकरून त्यांना सुख देण्यासाठी तो सगुण होतो, साकार होतो. हा देव कृष्णरूपात गोकुळात अवतरला. नंदाच्या घरी बागडला. ‘यमुनेच्या पावळी देखिली सावळी’ असं ज्ञानदेवांनी म्हटलं आहे. हा यशोधेचा कन्हैया सर्वांना वेड लावतो. कृष्णाच्या खोड्या, यमुनाकाठचे खेळ, त्याच्या अद्भुत लीला यांचे वर्णन संतांनी केले आहे.

https://prahaar.in/2026/06/27/water-scarcity-on-raigad-fort-will-be-resolved/

कृष्णाच्या मुरलीने साऱ्या गोप-गोपींना वेड लावले होते. त्या संगीतमय सुरांच्या नादांनी ते जणू नादावले होते. गोप-गोपाळांना जमवून विविध खेळ खेळणे, सवंगड्यांसह चोरून लोणी खाणे, गोपींची खोडी काढणे हा त्याचा आवडता उद्योग होता. रानात गाईबरोबर गेल्यावर सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून एका पंगतीत बसून गोपाळकाला खाणे त्याने रूढ केले. सामाजिक समतेच्या आशयाचा हा एक सुंदर, अर्थपूर्ण आविष्कार होता. गोपिका कृष्णाची तक्रार घेऊन यशोदेकडे गेल्या की यशोदा वरवर कृष्णावर रागावते. पण मनात तिला आपल्या मुलाचे मनःपूत कौतुक असते. या अभंगात नामदेवांनी यशोदेचे मनोगत वर्णन केले आहे. यशोदा म्हणते, ‘‘गोपींनो, माझं हे बाळ मोठं गुणाचं आहे, तान्हुलं आहे. मोठे गोजिरवाणं आहे. अगं बायांनो, याचं गाऱ्हाणं कसलं सांगता? हा श्रीरंग माझा बछडा आहे. याची सर कुणालाच येणार नाही. तुम्ही पाहिजे तर याची संगत सोडून द्या. माझ्या पोरावर तुम्ही कसले आळ घेता गं?’’ संत नामदेव म्हणतात, ‘‘यशोदे हा तुझा हृषीकेशी आम्हा गोकुळच्या गोपींना किती छळतो तुला काहीच ठाऊक नाही.” या अभंगातली गौळणींची तक्रार लाडिक आहे. यशोदेचा प्रेमभाव लडिवाळ आहे आणि विरोधी भक्तीचे हे रूप वेल्हाळ आहे. नामदेवांनी नादमय, संगीतपूर्ण रचना आपल्याला उत्कट भक्तीच्या झुल्यावर भुलविते. भक्तिरंगाच्या राजस, निरामय प्रदेशात घेऊन जाते.

_ – डॉ. देवीदास पोटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here