Home देश FSSAI ची मोठी कारवाई! खाद्यपदार्थांच्या पॅकिंगमध्ये स्टेपल पिन, मेटल वायरला बंदी; नियम मोडल्यास दंडाची कारवाई

FSSAI ची मोठी कारवाई! खाद्यपदार्थांच्या पॅकिंगमध्ये स्टेपल पिन, मेटल वायरला बंदी; नियम मोडल्यास दंडाची कारवाई

0
FSSAI ची मोठी कारवाई! खाद्यपदार्थांच्या पॅकिंगमध्ये स्टेपल पिन, मेटल वायरला बंदी; नियम मोडल्यास दंडाची कारवाई
food packaging

मुंबई : ग्राहकांच्या आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरी, मिठाई दुकाने तसेच सर्व खाद्य व्यवसायिकांना खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी स्टेपल पिन, मेटल वायर किंवा अशाच प्रकारच्या धातूच्या वस्तूंचा वापर करण्यास तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.

FSSAI च्या नव्या निर्देशानुसार, केक, मिठाईचे बॉक्स, स्नॅक्स पॅकेट्स, टेक-अवे फूड पार्सल्स आणि इतर खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये स्टेपल पिन किंवा मेटल वायर वापरण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळून आली आहे. काही प्रकरणांमध्ये या धातूच्या वस्तू थेट अन्नामध्ये किंवा पॅकिंगमध्ये सापडल्याने ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे.

https://prahaar.in/2026/06/15/share-market-news-us-iran-peace-deal-works-magic-on-the-share-market-sensex-surges-by-1100-points-nifty-reclaims-her-24000-mark/

प्राधिकरणाने स्पष्ट केले की, स्टेपल पिन किंवा मेटल वायर चुकून अन्नासोबत गिळल्या गेल्यास तोंड, घसा आणि पचनसंस्थेला इजा होऊ शकते. गंभीर परिस्थितीत मोठ्या आरोग्यविषयक गुंतागुंतीही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच कारणामुळे ही कठोर बंदी लागू करण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यवसायांवर Food Safety and Standards Act, 2006 अंतर्गत दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही FSSAI ने दिला आहे. त्यामुळे सर्व खाद्य व्यवसायांनी सुरक्षित आणि पर्यायी पॅकेजिंग पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://prahaar.in/2026/06/15/raid-on-illegal-mixed-hydrocarbon-oil-stock-in-thane-contraband-worth-%e2%82%b91-20-crore-seized/

विशेष म्हणजे, अलीकडेच FSSAI ने खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी किंवा सर्व्ह करण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर टाळण्याचे निर्देश दिले होते. वृत्तपत्रांमधील शाई आणि रासायनिक घटक अन्नामध्ये मिसळून आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात, असे प्राधिकरणाने नमूद केले होते.

ग्राहक सुरक्षा आणि अन्न गुणवत्तेबाबत अधिक कठोर धोरण अवलंबत FSSAI सातत्याने नवीन मार्गदर्शक सूचना जारी करत आहे. त्यामुळे आता खाद्य व्यवसायांना त्यांच्या पॅकेजिंग पद्धतींमध्ये आवश्यक बदल करणे अपरिहार्य ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here