नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एम. के. फोर्जिंग कंपनीत झालेल्या भीषण अपघातात दोन्ही हात गमावलेल्या कामगाराला तब्बल तीन महिने उलटूनही न्यायाची प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात आणि कंपनी व्यवस्थापनाच्या कथित निष्काळजीपणाविरोधात शुक्रवारी दुर्घटना कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. अखेर सोमवारी व्यवस्थापनासोबत चर्चा आयोजित करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
अमरजीत प्रसाद (३२) हा गेल्या नऊ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने एम. के. फोर्जिंगमध्ये कार्यरत आहे. १८ मार्च रोजी मशीनवर काम करत असताना झालेल्या भीषण अपघातात त्याचे दोन्ही हात निकामी झाले. या दुर्घटनेमुळे त्याचे आयुष्यच बदलून गेले. मात्र, तीन महिने उलटूनही अपघातासाठी जबाबदार कोण, याचा निर्णय झालेला नाही. नुकसानभरपाईबाबतही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने कामगारांमध्ये संतापाची भावना आहे.
https://prahaar.in/2026/06/13/nashik-bsnl-cable-theft-case-solved/
याप्रकरणी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. वाढत्या जनक्षोभानंतर विभागाने ८ जून रोजी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र, केवळ नोटीस देऊन प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली का, असा प्रश्न आता कामगार संघटना उपस्थित करत आहेत.
न्यायाच्या प्रतीक्षेत दारोदारी फिरूनही काहीच निष्पन्न होत नसल्याने अमरजीत प्रसाद यांचा संताप अनावर झाला. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक नरेश भारुळे यांच्या उपस्थितीतच त्यांनी आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या.”मुझे बचाया ही क्यों… मरने ही दिया होता!” या शब्दांतून अपघातानंतरच्या संघर्षाची आणि व्यवस्थेच्या उदासीनतेची तीव्र झळ दिसून आली. उपस्थित अनेकांच्या डोळ्यांत या आक्रोशाने अश्रू उभे राहिले.
https://prahaar.in/2026/06/13/diesel-sale-restriction-government-cracks-down-on-diesel-hoarding-limit-of-200-liters-of-diesel-per-vehicle-per-day-new-rules-in-effect/
अपघात सुरूच; जबाबदारी मात्र कुणाचीच नाही!
संबंधित कारखान्यात यापूर्वीही अनेक अपघात घडल्याची चर्चा आहे. मात्र, सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे. औद्योगिक सुरक्षा विभाग आणि कामगार उपायुक्त कार्यालय एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या प्रशासकीय ढिसाळपणाचा फटका मात्र कामगारांना बसत आहे. एका कामगाराचे दोन्ही हात गेले, आयुष्य उद्ध्वस्त झाले; तरीही तीन महिन्यांनंतरही ठोस कारवाई होत नसेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. अमरजीत यांना न्याय न मिळाल्यास बेमुदत आंदोलन छेडले जाईल.
कैलास मोरे, अध्यक्ष, दुर्घटना कामगार संघटना
व्यवस्थापनाचे उत्तर आल्यानंतर पुढील निर्णय
कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. व्यवस्थापनाकडून स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
नरेश भारुळे, उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग’