Home ब्रेकिंग न्यूज Pratap Sarnaik : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अमराठी चालकांना मराठी शिकण्याचे आवाहन;माध्यमांनाही सहकार्याचे साद

Pratap Sarnaik : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अमराठी चालकांना मराठी शिकण्याचे आवाहन;माध्यमांनाही सहकार्याचे साद

0
Pratap Sarnaik : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अमराठी चालकांना मराठी शिकण्याचे आवाहन;माध्यमांनाही सहकार्याचे साद
prataap sarnaik

 परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सर्व मराठी संपादकांना खुले पत्र

मुंबई : मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची, अस्मितेची आणि सामाजिक एकात्मतेची ओळख आहे. या भाषेचा सन्मान आणि संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहतूक चालकांनी व्यवहारिक मराठी शिकावी आणि प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा, या उपक्रमाला व्यापक लोकसमर्थन मिळावे यासाठी त्यांनी सर्व मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना खुले पत्र लिहून सहकार्याचे आवाहन केले आहे.

आपल्या पत्रात सरनाईक यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यावसायिक प्रवासी वाहन चालकाला व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे ही काळाची गरज आहे. प्रवाशांशी संवाद साधताना मराठीचा वापर वाढल्यास केवळ भाषेचे संवर्धन होणार नाही, तर समाजातील परस्पर संवाद अधिक सुसंवादी, आत्मीय आणि परिणामकारक बनेल.

https://prahaar.in/2026/06/11/satara-soldier-martyred-laid-down-his-life-while-on-duty-in-the-uri-sector-mourning-over-the-death-of-the-soldier-from-satara/

मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी नमूद केले की, भाषा ही केवळ शब्दांची देवाणघेवाण नसून ती संस्कृतीची वाहक असते. एखाद्या समाजाची परंपरा, मूल्ये आणि भावविश्व भाषेतूनच जपले जाते. त्यामुळे मराठी भाषेतून संवाद होणे आणि तो दैनंदिन व्यवहाराचा अविभाज्य भाग बनणे आवश्यक आहे.

मुंबई महानगर क्षेत्रासह राज्यातील विविध भागांत अनेक अमराठी चालक प्रवासी वाहतूक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्याकडून अनेकदा हिंदी किंवा इतर भाषांमध्ये संवाद साधला जातो. मात्र आता हेच चालक मराठी शिकून प्रवाशांशी मराठीत संवाद साधू लागले, तर ते मराठी भाषेच्या सन्मानासाठी आणि सामाजिक समन्वयासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे सरनाईक यांनी पत्रात नमूद केले आहे.

“आपण आपल्या राज्यात प्रवासी म्हणून किंवा नागरिक म्हणून वावरताना मराठी भाषेचा आग्रह धरणे स्वाभाविक आहे. मराठीचा अभिमान आणि तिचा वापर ही सवय प्रत्येकामध्ये रुजविण्याची वेळ आता आली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

https://prahaar.in/2026/06/11/beloved-sisters-will-soon-receive-the-may-installment/

माध्यमांच्या भूमिकेचा विशेष उल्लेख करताना सरनाईक यांनी म्हटले आहे की, समाजमन घडविण्यात प्रसारमाध्यमांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. या उपक्रमाला वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांतून प्रसिद्धी मिळाल्यास मराठी भाषा शिकण्याची चळवळ अधिक व्यापक आणि प्रभावी बनेल. माध्यमांच्या सहकार्यामुळे मराठी संवाद संस्कृतीला नवे बळ मिळेल आणि जनजागृतीचा हा संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राची अस्मिता यांचा सन्मान राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here