Home ब्रेकिंग न्यूज Mahayuti : महायुतीसमोर बंडखोरी थोपवण्याचे आव्हान

Mahayuti : महायुतीसमोर बंडखोरी थोपवण्याचे आव्हान

0
Mahayuti : महायुतीसमोर बंडखोरी थोपवण्याचे आव्हान

दिग्गजांनी भरले उमेदवारी अर्ज; नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुण्यात कुरघोड्या

मुंबई : राज्यातील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६ जागा आणि नागपूरमधील पोटनिवडणूक अशा एकूण १७ जागांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय नाट्य कमालीचे रंगले. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटून भाजप ११, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर लढणार असल्याचे निश्चित झाले असले, तरी प्रत्यक्ष अर्ज भरताना मित्रपक्षांनीच एकमेकांच्या जागांवर शड्डू ठोकल्याने महायुतीसमोर बंडखोरी थोपवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती अशा महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्येच एकमेकांवर कुरघोड्या सुरू असल्याचे चित्र सोमवारी दिसले.

https://prahaar.in/2026/06/01/share-market-crash-big-fall-in-the-stock-market-sensex-falls-by-500-points-investors-lose-rs-3-75-lakh-crore/

गेल्या दोन-अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे या जागा रिक्त होत्या. अखेर एकूण मतदार संख्येच्या ७५ टक्के कोटा उपलब्ध असल्याने या जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफूस चव्हाट्यावर आली. कोकण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला, तर ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र, उर्वरित बहुतांश जागांवर महायुती अंतर्गत बंडाचे निशाण फडकत असल्याचे दिसून आले.

https://prahaar.in/2026/06/01/ipl-2026-virat-kohlis-emotional-post-after-rcbs-second-title-is-viral/

अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मंत्री नितेश राणे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, महेंद्र थोरवे, योगेश निकम, निरंजन डावखरे, प्रमोद जठार उपस्थित होते. तर, रवींद्र फाटक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

पुण्यात रंगला हायव्होल्टेज ड्रामा

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यानंतर तिथे पक्षांतर्गत मोठा पेच निर्माण झाला होता. माजी आमदार आणि दिवंगत अजित पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे सुनील टिंगरे यांच्यासाठी पक्षातील आमदारांची मोठी फळी आग्रही होती. सुनेत्रा पवार यांच्या ‘जिजाई’ बंगल्यावर यासाठी आमदारांची बैठकही पार पडली. मात्र, या सर्व प्रक्रियेत पार्थ पवार यांचा शब्द अंतिम ठरल्याचे पाहायला मिळाले. पार्थ पवारांचे बालमित्र आणि माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांनी ऐनवेळी वडील संजय काकडेंसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि पक्षाची उमेदवारी पदरात पाडून घेतली. पक्षासाठी योगदान देणाऱ्या टिंगरेंना डावलून ऐनवेळी पक्षात आलेल्या काकडेंना उमेदवारी दिल्याने अजितदादांच्या जुन्या निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

https://prahaar.in/2026/06/01/neet-paper-leak-p-v-kulkarni-big-action-in-neet-paper-leak-case-hammer-attack-on-four-storey-building-in-beed-of-alleged-mastermind-p-v-kulkarni/

छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांच्या पुत्राचे बंड

महायुतीच्या जागावाटपात छत्रपती संभाजीनगर-जालन्याची जागा भाजपच्या वाट्याला गेली आणि भाजपने सुहास शिरसाट यांना अधिकृत उमेदवारी दिली. मात्र, यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये पसरलेल्या नाराजीचा गैरफायदा घेत, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांनी थेट भाजप उमेदवाराविरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल करत महायुतीला उघड आव्हान दिले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासात कार्यकर्त्यांमार्फत अर्ज दाखल करत सत्तारांनी बंडखोरीचे हत्यार उपसले. येथे महाविकास आघाडीकडून उबाठाचा उमेदवार आणि एमआयएम देखील रिंगणात असल्याने लढत रंगतदार होणार आहे.

https://prahaar.in/2026/06/01/mumbai-police-video-commendable-act-by-mumbai-police-woman-attempting-suicide-rescued-video-goes-viral/

नाशिक आणि अमरावतीतही मित्रपक्षांना शह

नाशिकची बहुचर्चित जागा अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटली आणि त्यांनी माजी आमदार नरेंद्र दराडे यांना पुन्हा उमेदवारी दिली. मात्र, जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच भाजपचे नेते गणेश गीते यांनी पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन स्वतंत्र अर्ज दाखल करून बंडखोरी केली. गीते यांच्या अर्जावर भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी सूचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्याने भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने याची गंभीर दखल घेत स्थानिक नेत्यांची कानउघाडणी सुरू केली आहे. असाच प्रकार अमरावतीत घडला असून, तिथे भाजपचे अधिकृत उमेदवार प्रवीण पोटे यांच्या विरोधात शिवसेनेचे विप्लव बाजोरीया यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकल्याने अमरावतीतही महायुती समोरासमोर आली आहे.

https://prahaar.in/2026/06/01/neet-paper-leak-p-v-kulkarni-big-action-in-neet-paper-leak-case-hammer-attack-on-four-storey-building-in-beed-of-alleged-mastermind-p-v-kulkarni/

साताऱ्यात मंत्री गोरेंच्या भावाची जाहीर नाराजी

सांगली-सातारा मतदारसंघात भाजपने धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर केल्याने खटाव-माणचे प्रबळ दावेदार आणि मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे नाराज झाले आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून “साहेब, मी नक्की कुठे चुकलो?” असा भावनिक सवाल विचारला आहे. गेल्या १३ वर्षांचा राजकीय संघर्ष संपवून आणि भाजप उमेदवाराला विधानसभेत ताकतीने निवडून आणूनही पक्षाने आपला शब्द पाळला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. या मतदारसंघात भाजपच्या धैर्यशील कदम यांच्या विरोधात शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांनीही अर्ज भरल्याने साताऱ्यात तिरंगी आणि गुंतागुंतीची लढत पाहायला मिळत आहे. आता ४ जून रोजी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत महायुतीचे नेते या बंडखोरांना शांत करण्यात यशस्वी होतात की बंडखोरी कायम राहते, यावरच निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

https://prahaar.in/2026/06/01/the-expansion-of-social-media-has-changed-the-nature-of-information-dissemination/

मतदारसंघनिहाय लढती

१) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – अरुण लखाणी (भाजप) विरुद्ध शैलेश देशमुख (काँग्रेस)
२) अमरावती : प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध हर्षदीप देशमुख (काँग्रेस) विरुद्ध विल्पव बजोरिया
३) सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध आदित्य फत्तेपूरकर (काँग्रेस)
४) सांगली-सातारा : धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभय जगताप (शरद पवार)
५) छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध देवयानी कृष्ण पाटील डोणगावकर (उबाठा) विरुद्ध समीर सत्तर (अपक्ष)
६) जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध शरद तायडे (उबाठा)
७) नागपूर (पोटनिवडणूक) : राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)
८) नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुद्ध अनिल कदम (उबाठा)
९) परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना ) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (उबाठा)
१०) यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना ) विरुद्ध साहेबराव कांबळे (काँग्रेस)
११) ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना ) विरुद्ध अभिजीत पवार (शरद पवार)
१२) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी) विरुद्ध सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने (उबाठा)
१३) पुणे : विक्रम काकडे (राष्ट्रवादी ), श्रीकांत पाटील (शरद पवार)
१४) धाराशिव-बीड-लातूर : बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)
१५) भंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर (भाजप) विरुद्ध प्रफुल अग्रवाल (काँग्रेस)
१६) अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे (भाजप) विरुद्ध राणी लंके (शरद पवार) विरुद्ध दीप चव्हाण (काँग्रेस)
१७) नांदेड : अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील सुमठाणकर (काँग्रेस)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here