Home ब्रेकिंग न्यूज Pratap Sarnaik : शालेय सहलींतून एसटीच्या तिजोरीत १२७ कोटींची भर

Pratap Sarnaik : शालेय सहलींतून एसटीच्या तिजोरीत १२७ कोटींची भर

Pratap Sarnaik : शालेय सहलींतून एसटीच्या तिजोरीत १२७ कोटींची भर
PRATAP SARNAIK

महसुलात मोठी वाढ; सुरक्षित प्रवासाला पालकांची पसंती

मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यातील ‘लाल परी’ने शालेय सहलींच्या माध्यमातून यंदा यशाचे नवे शिखर गाठले आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात एसटीने २५ हजार ५५८ बस फेऱ्यांच्या माध्यमातून तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविले असून, मागील वर्षाच्या तुलनेत महसुलात ३३ कोटी २९ लाखांची मोठी वाढ झाली आहे. सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी आजही ‘एसटी’च विद्यार्थ्यांची पहिली पसंती असल्याचे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, शालेय सहल हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटन स्थळांची ही मुशाफिरी सुरक्षित असावी, याकडे शासनाचा कटाक्ष आहे. या शैक्षणिक वर्षात लाखो विद्यार्थ्यांनी एसटीच्या माध्यमातून सुखकर प्रवास केला असून, सुरक्षिततेच्या बाबतीत एसटीला पर्याय नाही, यावर या उत्पन्नाने शिक्कामोर्तब केले आहे.

शाळा आणि महाविद्यालयांनी एसटीच्या माध्यमातून सहलींचे आयोजन केल्यास विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात शासनाकडून ५० टक्के सवलत दिली जाते. यामुळेच विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांना एसटीचा आधार मोठा वाटतो. खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत माफक दर आणि विश्वासार्हता ही एसटीची बलस्थाने ठरली आहेत.

नव्या बसेसमुळे प्रवास झाला सुखकर

यंदा बहुतांश सहलींसाठी महामंडळाने नव्या आणि अद्ययावत बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास केवळ सुरक्षितच नाही, तर अत्यंत आरामदायी आणि समाधानकारक झाला. राज्यभरातून मिळालेल्या २५ हजार ५५८ बस फेऱ्यांच्या मागणीवरून एसटीवरील जनतेचा विश्वास अधोरेखित झाला आहे.

शालेय सहलींसाठी एसटीने नेहमीच पुढाकार घेतला आहे. आगामी काळातही शाळा-महाविद्यालयांनी खासगी बसेसच्या मागे न लागता एसटीच्या सुरक्षित प्रवासालाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन मी करतो.