Home देश पहाटे 2 वाजता सीमेवर खळबळ! पठाणकोटमध्ये पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफने ठोकले; हाय अलर्ट जारी

पहाटे 2 वाजता सीमेवर खळबळ! पठाणकोटमध्ये पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफने ठोकले; हाय अलर्ट जारी

0
पहाटे 2 वाजता सीमेवर खळबळ! पठाणकोटमध्ये पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफने ठोकले; हाय अलर्ट जारी
पठाणकोटमध्ये पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफने ठोकले (Photo: ANI)

पठाणकोट : पंजाबमधील पठाणकोट येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) सतर्क जवानांनी वेळीच हाणून पाडला आहे. सीमेवर तैनात असलेल्या जवानांनी दिलेल्या स्पष्ट इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत भारतीय हद्दीत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी घुसखोराला गोळीबारात ठार करण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना घडल्यामुळे संपूर्ण सीमावर्ती भागात खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचालींना वेग दिला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाणकोटमधील उझ नदीजवळ असलेल्या पहाडपूर सीमा चौकी परिसरात पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रात्रीच्या अंधारात आणि थंडीच्या वातावरणात बीएसएफच्या जवानांना आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एका संशयित व्यक्तीची हालचाल दिसून आली. जवानांनी तत्काळ त्या व्यक्तीला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, त्याने या इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत पुढे जाणे सुरूच ठेवले. संभाव्य धोका आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जवानांनी गोळीबार केला. या कारवाईत संबंधित घुसखोर जागीच ठार झाला.

https://www.prahaar.in/2026/11/27/telangana-adilabad-honour-killing-news-father-kills-daughter-before-two-days-of-engagement-love-affair-crime/

दरम्यान, हिवाळ्याच्या दिवसांत उत्तर भारतात धुक्याचे प्रमाण वाढते आणि या धुक्याचा फायदा घेऊन सीमेवरून घुसखोरी किंवा घातपाती कारवाया होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांकडून सतर्कता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. संभाव्य धोके टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागासह सेकंड लाइन ऑफ डिफेन्सवर विशेष देखरेख ठेवली जात आहे. प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी गस्त वाढवण्यात आली आहे.

बीएसएफच्या समन्वयाने स्थानिक पोलिसांकडून सीमावर्ती परिसरात विशेष शोधमोहीम राबवण्यात येत आहे. परिसरातील संशयास्पद जागा, शेतीचा भाग आणि नदीकाठच्या पट्ट्यांची कसून झाडाझडती घेतली जात आहे. तसेच, जिल्ह्यातील विविध पोलीस नाक्यांवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना अधिक सतर्क राहण्याच्या आणि वाहनांची तसेच प्रवाशांची सुरक्षा तपासणी कठोर करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पठाणकोट जिल्ह्यातील हा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. या भौगोलिक भागाला एका बाजूला भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा लागून आहे, तर दुसऱ्या बाजूला जम्मू-काश्मीरची सीमाही जोडलेली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या संवेदनशीलतेमुळे हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण परिसरात सुरक्षा यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here