अत्याधुनिक शस्त्र देऊन, उत्तम सोयीसुविधांनी युक्त गाड्या देऊन, चांगला पगार देऊन किंवा त्यांच्या जलद बढत्यांची तजवीज करूनही पोलिसांच्या कार्यक्षमतेत सुधारणा होणार नाही, हे राज्यकर्त्यांपासून सामान्य जनांपर्यंत सर्वांनी एकदा मान्य करून टाकलेलं बरं. त्याशिवाय पोलीस या यंत्रणेवरचं आपलं अवलंबित्व कमी होणार नाही. प्रत्येक धक्कादायक गुन्ह्यानंतर पोलिसांना उगाच (जनतेच्या न्यायालयात) आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागणार नाही! कायद्याने पोलिसांना मोठी ताकद दिली आहे. समाज (आणि गुन्हेगारही!) अजून खाकी वर्दीचा मान ठेवतात. न्यायासाठी न्यायालय अंतिम असलं, तरी न्यायालयापर्यंत कोणी, कसं जायचं हे गुन्हेगारीच्या खटल्यात पोलीसच ठरवत असतात. मदतीसाठी आलेल्या सामान्य माणसाला कसा आणि किती न्याय द्यायचा, हे स्थानिक पोलीस ठाण्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असतं. पोलिसांच्या कामाच्या सोयीसाठी सरकारने पोलीस ठाण्यांच्या इमारती अद्ययावत केल्या, पोलिसांना तंत्रसज्ज केलं ;त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षणं दिली. टॅब, लॅपटॉप, उत्तमातले उत्तम मोबाईल फोन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सुविधा पोलीस ठाण्यात उपलब्ध करून दिल्या. पोलिसांची कार्यक्षमता वाढावी, काळाच्या गतीत महाराष्ट्राची सुरक्षा यंत्रणा मागे राहू नये यासाठी सरकारने मोठा खर्च केला. पण, तमाम पोलीस यंत्रणेने जणू ठरवून सरकारचे हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरवले. वीस वर्षांपूर्वी नेस्तनाबूत केलेल्या अंडरवर्ल्डने पुन्हा नव्या अवतारात डोकं काढलं. खंडणीसाठी नाक्यावरच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या विक्रेत्यांना धमकावण्यासाठी स्थानिक गुंडांची भीडही चेपली. टायगर श्रॉफवर झालेला गोळीबार, परवा पुण्यात न्यायालयाच्या परिसरात कोयत्या- कुऱ्हाडीने झालेला खुनी हल्ला किंवा त्याच दिवशी मुंबईत माटुंग्याला ‘पी सी जैन ज्वेलर्स’च्या दुकानावर झालेला गोळीबार या सलग घटना ‘ते जुने दिवस आल्या’ ची वर्दी घेऊन आल्या आहेत, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. या हल्ल्यांमध्ये हल्लेखोरांनी ज्यांच्यावर हल्ला केला, ते कोण आहेत किंवा या हल्ल्यांना पार्श्वभूमी काय आहे, हा मुद्दा वेगळा. सामान्य माणसाच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढवण्यात या घटना पूर्ण यशस्वी ठरल्या आहेत, हे सत्य आहे. पोलीस यंत्रणेचं हेच सर्वात मोठं अपयश आहे.
वाढत्या गुन्हेगारीकडे बोट दाखवलं, की पोलीस यंत्रणेकडून दोन गोष्टींकडे बोट दाखवलं जातं. धीमी, मवाळ न्यायव्यवस्था आणि राजकीय हस्तक्षेप. भारतीय न्यायव्यवस्था तुलनेने धीमी आहे, हे खरं आहे. पण, त्याला त्यांच्यावर असलेला कामाचा ताणही कारणीभूत आहे. ज्या न्याय संहितेने व्यक्तीला त्याचा बचाव करण्याचे अधिकार दिले आहेत, त्याच न्याय संहितेने पोलिसांनाही तपासाचे, गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी पुराव्यासह आरोप ठेवण्याचे, ते सिद्ध करण्याचे सक्षम अधिकार दिले आहेत. पोलिसांकडून त्याचा अभ्यासपूर्ण, कार्यक्षम, अचूक वापर होत नाही, ही न्याय यंत्रणेची खंत आहे. पोलिसांचा तपास अनेकदा इतका अशास्त्रीय, कच्चा असतो, की आरोपीला स्वतःची सुटका करून घ्यायला फार कष्ट करावेच लागत नाहीत. त्याची सोय त्या तपासातच असते!
आरोपपत्र दाखल करताना त्यातले किमान विरोधाभासही टाळले टाळले जाणार नसतील, तर न्यायव्यवस्थेने स्वतः त्यातील त्रुटी दूर करायच्या का? राजकीय हस्तक्षेप ही वस्तुस्थिती असली, तरी लोकशाही व्यवस्थेत असा हस्तक्षेप गृहीत धरला पाहिजे. लोकप्रतिनिधी, वेगवेगळ्या पातळीवरचे आणि क्षमतांचे राजकीय – सामाजिक कार्यकर्ते पोलिसांच्या संपर्कात राहणारच. स्थानिक पातळीवर त्यांचे आक्षेप आणि आग्रह असणारच. कोणत्याही दर्जाचा पोलीस कर्मचारी ज्या समाजातून पोलिस दलात सामील झाला आहे, त्या समाजाचं हे वास्तव आहे. त्याबाबत समाजातला प्रत्येक नागरिक परिचित असताना पोलिसांनाच त्यात आगळीक का वाटावी? पोलिसांचा स्वतःचा कारभार चोख असेल, कर्तव्याप्रती न्यायबुद्धी असेल, तर असा हस्तक्षेप हा फार मोठा अडथळा नसतो, त्यावरही मात करता येते, हा असंख्य प्रामाणिक, कर्तव्यदक्ष पोलिसांचाच अनुभव आहे. हितसंबंधांनी पुरेपूर झाकोळलेली अकार्यक्षमता झाकण्यासाठी जर या दोन कारणांचा ढालीसारखा वापर केला जात असेल, तर ही ढाल अशा आणखीही कितीतरी आरोपांचे वार झेलायला समर्थ ठरेल, एवढं खरं! आपल्या पेशाची आणि अंगावरील वर्दीची प्रतिष्ठा राखण्याची इच्छा असेल, तर इतरत्र बोट दाखवण्यापेक्षा पोलिसांनी आत्मपरीक्षणच केलेलं बरं!
टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर पोलीस तपासातून बाहेर आलेली माहिती अधिक गंभीर आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी काचेच्या बंद पेटीतून घराबाहेर येऊन आपल्या चाहत्यांना वाढदिवशी दर्शन दिलं. त्यांच्या शैलीत त्यांनी पोलिसी कार्यक्षमतेचा केलेला तो निषेध होता. मुंबईतलं किमती बॉलीवूड दहशतीच्या छायेत फार लवकर खेचता येतं. त्यादृष्टीने ते ‘सॉफ्ट टार्गेट’ आहे. जे दाऊदने ओळखलं, त्याचाच कित्ता आता बिश्नोई टोळी गिरवते आहे. पोलिसांनी त्यासाठी आत्ताच सावध झालं पाहिजे. अधिक धाडसी आणि चाणाक्ष वरिष्ठ अधिकारी निवडले पाहिजेत. पोलीस आणि राज्य सरकारचं प्रशासन- हे दोन्ही चाकं लगेचच ठिकाणावर आणली पाहिजेत. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी तोच उपाय आहे.