Home ब्रेकिंग न्यूज Oregon coast king tide video : काळजाचा ठोका चुकवणारा थरार! ‘किंग टाइड’च्या महाकाय लाटांमध्ये माणूस आणि कुत्रा वाहून गेले, पण पुढे जे घडलं…

Oregon coast king tide video : काळजाचा ठोका चुकवणारा थरार! ‘किंग टाइड’च्या महाकाय लाटांमध्ये माणूस आणि कुत्रा वाहून गेले, पण पुढे जे घडलं…

0
Oregon coast king tide video : काळजाचा ठोका चुकवणारा थरार! ‘किंग टाइड’च्या महाकाय लाटांमध्ये माणूस आणि कुत्रा वाहून गेले, पण पुढे जे घडलं…

अमेरिकेतील ओरेगन प्रांताच्या समुद्रकिनाऱ्यावर उसळलेल्या जोरदार लाटांमध्ये एक माणूस आणि त्याचा पाळीव कुत्रा वाहून गेल्याची धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. सुदैवाने दोघेही वेळेवर सावरले आणि कोणतीही दुखापत न होता सुखरूप बाहेर आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. कैनन बीच भागातील ईकोला क्रीकजवळ ही घटना घडली. स्थानिक पोलिसांनी या थरारक घटनेचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार घडण्यापूर्वी काही तास आधीच पोलिसांनी त्या व्यक्तीला समुद्रकिनाऱ्यावरील संभाव्य धोक्याबाबत सावध केले होते.

पोलिसांचा इशारा आणि दंडात्मक कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास टोलोवाना वेयसाइडच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर एक व्यक्ती गाडी चालवत असल्याचे एका पोलिसाच्या लक्षात आले. पोलिसांनी गाडी थांबवून विचारणा केली असता, समुद्रातील प्रचंड उंच लाटा जवळून पाहायच्या असल्याचे त्याने सांगितले. तेव्हा पोलिसांनी त्याला धोक्याची जाणीव करून दिली आणि किनाऱ्यावर गाडी चालवल्याबद्दल दंडाची कारवाई केली. मात्र, पोलिसांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत तो पुढे गेला आणि अवघ्या दोन तासांतच, म्हणजे सकाळी साडेदहाच्या सुमारास ईकोला क्रीक परिसरात तो आणि त्याचा कुत्रा लाटांमध्ये ओढले गेल्याची माहिती पोलीस व अग्निशमन दलाला मिळाली.

पाण्याच्या रेट्यात दोघेही ओढले गेले

व्हायरल व्हिडिओमध्ये हा माणूस आपल्या कुत्र्याचा पट्टा हातात धरून किनाऱ्यावर उभा असल्याचे दिसते. अचानक एक मोठी लाट येते आणि कुत्रा पाण्याकडे खेचला जातो. पाण्याचा जोर इतका असतो की कुत्र्याचा पट्टा हातातून निसटतो. त्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी तो माणूस तेथील पायऱ्यांचा आधार घेण्याचा प्रयत्न करतो, पण काही क्षणांतच दुसऱ्या जोरदार लाटेचा तडाखा बसून तोही पाण्यात खेचला जातो. दोघेही काही काळ पाण्याच्या प्रवाहात अडकल्याचे दिसते, मात्र जिद्दीने प्रयत्न करत ते दुसऱ्या पायऱ्यांपर्यंत पोहोचतात आणि सुखरूप किनाऱ्यावर येतात.

‘किंग टाइड’च्या काळात पोलिसांचे नागरिकांना आवाहन

या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना ‘किंग टाइड’च्या काळात विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. किनारी भागातील पायऱ्याही नेहमी सुरक्षित नसतात, त्यामुळे समुद्राकडे पाठ करून उभे राहू नये, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. पाळीव प्राण्यांना पाण्यापासून दूर ठेवावे आणि लाटांसोबत वाहून येणाऱ्या मोठ्या लाकडी ओंडक्यांपासून सावध राहावे, कारण जोरदार लाटांमुळे ते अंगावर आदळून दुखापत होऊ शकते. केवळ फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी स्वतःचा, पाळीव प्राण्याचा किंवा बचाव पथकाचा जीव धोक्यात घालू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

‘किंग टाइड’ म्हणजे नेमके काय ?

‘किंग टाइड’ हा कोणताही शास्त्रोक्त शब्द नसून, समुद्राला येणाऱ्या नेहमीपेक्षा अधिक उंच भरतीसाठी तो वापरला जातो. अमावस्या किंवा पौर्णिमेच्या आसपास, तसेच चंद्र पृथ्वीच्या तुलनेने अधिक जवळ आल्यावर अशी उंच भरती निर्माण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here