जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांना करावी लागणारी सरकारी कार्यालयांची धावपळ आता कमी होणार आहे. महाराष्ट्र शासनाने जात प्रमाणपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 25 नोव्हेंबर 2026 रोजी यासंदर्भात शासन परिपत्रक जारी केले आहे. या नव्या निर्णयामुळे अर्ज दाखल करण्यापासून ते कागदपत्रांची पडताळणी, सुनावणी आणि अंतिम प्रमाणपत्र मिळवण्यापर्यंतची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे.(Caste Validity)
आता ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत!
नव्या निर्णयानुसार, जात वैधता प्रमाणपत्रासाठी यापुढे केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे, पुरावे आणि प्रतिज्ञापत्रे स्कॅन करून ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करावी लागतील. यापूर्वी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची प्रिंट काढून संबंधित जात पडताळणी समितीच्या कार्यालयात कागदपत्रांसह जमा करावी लागत होती. मात्र, आता ही प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कागदपत्रे जमा करण्यासाठी वारंवार कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.
https://www.prahaar.in/2026/11/26/memories-of-the-26-11-mumbai-attacks-the-case-of-the-bomb-blasts-that-shook-mumbai/
आधार क्रमांकाशी जोडला जाणार अर्ज
नव्या डिजिटल प्रणालीमध्ये अर्जदाराचा अर्ज आधार क्रमांकाशी जोडला जाणार आहे. अर्जदाराला एकच अर्ज सादर करता येणार आहे. जात नोंदीसंदर्भातील आणि निर्धारित मानीव दिनांकापूर्वीच्या वास्तव्याचा प्रत्येकी किमान एक दस्तऐवजी पुरावा सादर करणे आवश्यक राहणार आहे. आवश्यक पुरावा उपलब्ध नसल्यास नियमानुसार स्वयंघोषणापत्र सादर करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. मात्र, गरज भासल्यास पडताळणी समिती अर्जदाराकडून अतिरिक्त कागदपत्रे मागवू शकते.(Online Application)
सुनावणीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे!
या निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जात पडताळणीसाठी आवश्यक असलेली सुनावणीदेखील ऑनलाइन होणार आहे. अर्जदाराला सुनावणीसाठी बोलावण्याची आवश्यकता असल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. केवळ विशेष आणि अपवादात्मक परिस्थितीतच प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची परवानगी असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांसह इतर अर्जदारांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचण्यास मदत होणार आहे.
शक्यतो 60 दिवसांत निर्णय; व्हॉट्सॲपवर मिळणार प्रमाणपत्र
शासनाच्या नव्या निर्देशांनुसार, जात पडताळणी समितीने शक्यतो 60 दिवसांच्या आत अर्जावर निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याची माहिती अर्जदाराला एसएमएस, व्हॉट्सॲप किंवा ई-मेलद्वारे दिली जाणार आहे. अर्जदाराला ऑनलाइन माध्यमातून त्रुटींची पूर्तता करण्याची संधी मिळेल. अंतिम निर्णयाची माहितीही डिजिटल माध्यमातून कळवली जाणार असून, डिजिटल स्वाक्षरी असलेले जात वैधता प्रमाणपत्र ई-मेल आणि व्हॉट्सॲपवर पाठवण्याची सुविधा उपलब्ध असेल.
अर्जदारांसाठी एआय चॅटबॉटची सुविधा
नव्या प्रणालीमध्ये अर्जदारांच्या मदतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित चॅटबॉटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्ज करताना येणाऱ्या अडचणी, प्रक्रियेसंदर्भातील प्रश्न आणि आवश्यक मार्गदर्शनासाठी या सुविधेचा उपयोग करता येईल.(Digital Maharashtra)
https://www.prahaar.in/2026/11/26/kasabas-bullets-changed-lives-terrorists-destroyed-families-completed-18-years-of-26-11-attacks-the-struggle-of-the-victims-continues-even-today/
जात वैधता प्रमाणपत्रासाठी किती शुल्क?
नव्या व्यवस्थेनुसार प्रमाणपत्राच्या प्रयोजनानुसार शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
- शैक्षणिक प्रयोजनासाठी : 100 रुपये
- ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी : 500 रुपये
- महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी : 1,000 रुपये
- नोकरीसंबंधित प्रयोजनासाठी : 1,000 रुपये
- शासकीय योजनांचा लाभ आणि सवलतींसाठी : 1,000 रुपये
अर्ज कुठे करायचा?
जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्जदारांना बार्टीच्या नवीन ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करता येणार आहे. एकूणच, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः महाविद्यालयीन प्रवेश, शिष्यवृत्ती आणि सरकारी नोकरीसाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळू शकतो.(Caste Verification)