मुंबई: हरियाणातील रोहतक जिल्ह्यामध्ये मध्यरात्री घडलेल्या एका रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. बुधवारी (25 नोव्हेंबर) मध्यरात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास खरावड पोलिस चौकीपासून काही हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘मिलन ढाबा’वर पाच हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करत चार तरुणांची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे ढाब्यावर उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये मोठी घबराट उडाली आहे. शिवाय, अनेक नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी खुर्च्या आणि टेबलांचा आधार घेत लपण्याचा प्रयत्न केला.
https://www.prahaar.in/2026/11/25/that-one-photo-has-sent-mumbai-indians-fans-into-a-frenzy-will-rohit-sharma-become-captain-again/
मिळालेल्या माहितीनुसार, पाचही हल्लेखोर स्विफ्ट कारमधून घटनास्थळी आले होते. त्या वेळी ढाब्यावर काही तरुण जेवण करत होते. हल्लेखोरांनी कोणताही इशारा न देता किंवा कोणतेही संभाषण न करता थेट गोळीबार सुरू केला. अचानक सुरू झालेल्या या गोळीबारामुळे ढाब्यावर ग्राहकांची आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू झाली. या हल्ल्यात तीन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चौथा तरुण जीव वाचवण्याच्या प्रयत्नात तिथून पळत होता, मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्यालाही गोळ्या घालून ठार केले. या संपूर्ण थरारानंतर आरोपी काही मिनिटे घटनास्थळीच शस्त्रे नाचवत फिरत होते आणि त्यानंतर कारमधून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
https://www.prahaar.in/2026/11/25/conclusion-of-world-heritage-week-at-the-lucknow-state-museum-winners-of-competitions-felicitated/
रोहतक पोलीसांना मृत तरुणांची ओळख पटवण्यासाठी यश मिळाले आहे. मृतांपैकी तिघे जण झज्जर जिल्ह्यातील डीघल गावचे रहिवासी होते, तर चौथा तरुण बेरी परिसरातील असल्याचे समोर आले आहे. रिंकू, विनित आणि गंजू अशी डीघल येथील मृत तरुणांची नावे असून, हिमांशु हा बेरी परिसरातील रहिवासी होता. या घटनेमुळे संबंधित गावांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, या हत्याकांडामागे भाऊ रिटोलिया टोळी आणि सन्नी रिटोलिया टोळी यांच्यातील गँगवॉर कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. शिवाय, डीघल गावात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका तरुणाच्या हत्येशी या घटनेचे धागेदोरे जोडले जात आहेत. मात्र, हत्येचे नेमके कारण काय आणि हल्लेखोर कोण होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
https://www.prahaar.in/2026/11/25/surge-in-this-railway-stock-20-percent-jump-in-a-single-day-investors-take-note/
घटनेची माहिती मिळताच रोहतक पोलीस रेंजचे आयजी हमिद अख्तर मध्यरात्री घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत पोलिस अधीक्षक गौरव राजपुरोहित आणि जिल्ह्यातील इतर वरिष्ठ पोलिस अधिकारीही उपस्थित होते. सीआयए, स्पेशल सेल आणि न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (एफएसएल) पथकांनी घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. आरोपींची कार आणि ते कोणत्या दिशेने पळून गेले, याचा शोध घेण्यासाठी पोलिस आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके कार्यरत असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.