Home देश Nepal Flood : नेपाळमधील पुरानंतर 213 भारतीय बेपत्ता; कुटुंबीयांना 2 डिसेंबरपर्यंत यादी तपासण्याचे आवाहन

Nepal Flood : नेपाळमधील पुरानंतर 213 भारतीय बेपत्ता; कुटुंबीयांना 2 डिसेंबरपर्यंत यादी तपासण्याचे आवाहन

0
Nepal Flood : नेपाळमधील पुरानंतर 213 भारतीय बेपत्ता; कुटुंबीयांना 2 डिसेंबरपर्यंत यादी तपासण्याचे आवाहन

नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरानंतर बेपत्ता झालेल्या भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. नेपाळमधील भारतीय दूतावासाने बेपत्ता भारतीय नागरिकांची नेपाळी प्रशासनाने प्रसिद्ध केलेली यादी तपासण्याचे आवाहन केले आहे. यादीतील नावांबाबत काही शंका, आक्षेप किंवा दुरुस्ती सुचवायची असल्यास 2 डिसेंबर 2026 पर्यंत माहिती सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDRRMA) बेपत्ता असलेल्या 213 भारतीय नागरिकांची यादी जाहीर केली आहे. बेपत्ता व्यक्तींना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अधिकृतरीत्या मृत घोषित करण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/26/streamlining-of-20-services-of-the-land-records-department-citizens-will-now-have-access-to-6-key-services/

पुरानंतर 1,400 हून अधिक जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती. या आपत्तीनंतर 1,400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर परदेशी नागरिकांसह 5,000 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. नेपाळ सरकारने विहित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बेपत्ता व्यक्तींना अधिकृतरीत्या मृत घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पुरामुळे भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांच्या काठावरील पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. तसेच जवळपास डझनभर जलविद्युत प्रकल्पांनाही फटका बसला.

यादीत नाव असल्यास काय करावे?

NDRRMA ने बेपत्ता भारतीय नागरिकांची यादी सार्वजनिक करून त्यातील तपशिलांमध्ये भर घालणे, नाव वगळणे किंवा माहिती दुरुस्त करण्यासाठी नागरिकांकडून आक्षेप आणि विनंत्या मागवल्या आहेत. काठमांडू येथील भारतीय दूतावासाने बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबीयांना यादीचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करण्याचे आवाहन केले आहे.

यादीतील माहितीबाबत काही चिंता, आक्षेप किंवा सुधारणा सुचवायची असल्यास 2 डिसेंबर 2026 पर्यंत ती सादर करावी, असे दूतावासाने निवेदनात म्हटले आहे.

मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू होणार

आक्षेप आणि बदलांच्या मागण्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नेपाळ सरकार अंतिम यादी तयार करेल आणि अधिकृत मृत्यू घोषणा जारी करेल. त्यानंतर संबंधित स्थानिक प्रशासनाकडून मृत्यू प्रमाणपत्रे मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. या प्रक्रियेदरम्यान कुटुंबीयांकडून अतिरिक्त माहिती आणि कागदपत्रे मागवली जाऊ शकतात. यासंदर्भात पुढील काही दिवसांत अधिक माहिती दिली जाणार असल्याचे भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे.

12 देशांतील 452 परदेशी नागरिक बेपत्ता

NDRRMA च्या सूचनेनुसार, 12 देशांतील राजनैतिक दूतावासांकडून बेपत्ता झालेल्या 452 परदेशी नागरिकांची पडताळणी केलेली माहिती प्राप्त झाली आहे. यामध्ये 213 भारतीय, 85 चिनी, 69 अमेरिकन, 32 ब्रिटिश आणि 27 कॅनेडियन नागरिकांचा समावेश आहे. याशिवाय सिंगापूरचे 9, दक्षिण आफ्रिकेचे 6, फ्रान्सचे 4, तर हंगेरी, बेल्जियम आणि कझाकस्तानचे प्रत्येकी 2 नागरिक बेपत्ता आहेत. बेलारूसच्या एका नागरिकाचाही या यादीत समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here