Home टेक्नॉलॉजी तुमचा खासगी डेटा सुरक्षित आहे का ? जगभरातील ३.५ अब्जांहून अधिक डेटा रेकॉर्ड लीक ; ईमेल, पासवर्डसह वैयक्तिक माहिती उघड

तुमचा खासगी डेटा सुरक्षित आहे का ? जगभरातील ३.५ अब्जांहून अधिक डेटा रेकॉर्ड लीक ; ईमेल, पासवर्डसह वैयक्तिक माहिती उघड

0
तुमचा खासगी डेटा सुरक्षित आहे का ?  जगभरातील ३.५ अब्जांहून अधिक डेटा रेकॉर्ड लीक ; ईमेल, पासवर्डसह वैयक्तिक माहिती उघड

जगभरातील इंटरनेट युजर्सच्या डेटा सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. सायबर सिक्युरिटी संशोधकांनी डेटा लीकच्या दोन मोठ्या घटनांचा खुलासा केला असून, यामध्ये तब्बल ३.५ अब्जांहून अधिक डेटा रेकॉर्ड उघड झाल्याची माहिती समोर आली आहे. या लीकमध्ये ई-मेल आयडी, युजरनेम, पासवर्ड, मोबाईल क्रमांक, सरकारी ओळख क्रमांक आणि वैयक्तिक कागदपत्रांचा समावेश आहे. त्यामुळे ऑनलाइन फसवणूक, अकाउंट हॅकिंग आणि ओळख चोरीचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

‘वायर्ड’च्या अहवालानुसार, या दोन्ही डेटा लीक प्रकरणांचा शोध वेगवेगळ्या सायबर सिक्युरिटी संशोधकांनी लावला आहे. यातील एका डेटाबेसमध्ये सुमारे २ अब्ज लॉगिन रेकॉर्ड, तर दुसऱ्या डेटाबेसमध्ये चीनशी संबंधित १.६४ अब्ज रेकॉर्ड आढळले आहेत. मात्र, या आकड्यांचा अर्थ ३.५ अब्ज लोकांचा डेटा लीक झाला असा होत नाही. कारण एकाच व्यक्तीची माहिती वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये नोंदवलेली असू शकते.

मालवेअरच्या माध्यमातून २ अब्ज लॉगिन रेकॉर्ड चोरीला ?

पहिल्या डेटा लीक प्रकरणाचा शोध Black Hills Information Security या संस्थेचे संशोधक जेरेमिया फाउलर यांनी लावला. त्यांना एका डेटाबेसमध्ये तब्बल २ अब्ज लॉगिन रेकॉर्ड आढळले. यामध्ये ई-मेल अ‍ॅड्रेस, पासवर्ड, युजरनेम, कुकीज, सेशन टोकन आणि डिव्हाइसशी संबंधित माहितीचा समावेश होता. विशेष म्हणजे, हा संपूर्ण डेटा देशानुसार ८ हजार ४७१ वेगवेगळ्या फोल्डर्समध्ये विभागण्यात आला होता.

संशोधकांच्या मते, यातील बहुतांश माहिती ‘इन्फो स्टीलर’ मालवेअरच्या माध्यमातून चोरली गेली असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे मालवेअर एखाद्या व्यक्तीच्या डिव्हाइसमध्ये सेव्ह असलेले पासवर्ड, लॉगिन डिटेल्स आणि इतर वैयक्तिक माहिती चोरू शकतात. त्यानंतर हा डेटा सायबर गुन्हेगारांकडून खरेदी-विक्रीसाठी वापरला जातो. या प्रकरणातील सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे डेटाबेसमध्ये जवळपास ४ लाख वैयक्तिक कागदपत्रे आढळली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे एखाद्या व्यक्तीच्या डिजिटल हालचाली आणि खासगी माहितीचा तपशीलवार प्रोफाइल तयार केला जाऊ शकतो, अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/25/explained-sci-tech-whatsapp-web-security-risks-mha-advisory-safety-guidelines/

चीनशी संबंधित १.६४ अब्ज रेकॉर्ड उघड

दुसऱ्या डेटा लीक प्रकरणाचा शोध सायबर सिक्युरिटी कंपनी UpGuard चे रिसर्च डायरेक्टर ग्रेग पोलॉक यांनी लावला. त्यांना १.६४ अब्ज डॉक्युमेंट्स असलेला एक डेटाबेस आढळला. हा डेटा प्रामुख्याने चीनमधील नागरिक आणि तेथील व्यावसायिक संस्थांशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. या डेटाबेसमध्ये सुमारे ८४ कोटी राष्ट्रीय ओळख क्रमांक, ३० कोटी मोबाईल क्रमांक, १.१ कोटी विद्यार्थ्यांच्या नोंदणीशी संबंधित रेकॉर्ड आणि जवळपास ८० लाख व्यावसायिक नोंदणीची माहिती होती. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये लहान मुले आणि मृत व्यक्तींची माहितीही आढळली आहे.

अहवालानुसार, या डेटाबेसला कोणत्याही पासवर्डशिवाय किंवा ओळख पडताळणीशिवाय प्रवेश मिळवता येत होता. मात्र, संशोधकांकडून तपास सुरू असतानाच हा डेटाबेस अचानक उपलब्ध होणे बंद झाले. यामागे रॅन्समवेअर हल्ला किंवा अन्य सायबर हालचाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

डेटा लीकमुळे ऑनलाइन फसवणुकीचा धोका

संशोधकांच्या मते, अशा प्रकारे वेगवेगळ्या स्रोतांमधून गोळा केलेली वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगारांसाठी मोठे हत्यार ठरू शकते. या माहितीचा वापर बनावट ओळख तयार करणे, सोशल मीडिया आणि बँकिंग अकाउंट्समध्ये अनधिकृत प्रवेश मिळवणे, तसेच नागरिकांना लक्ष्य करून ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी केला जाऊ शकतो.

दरम्यान, यापूर्वी २०२४ मध्ये ‘मदर ऑफ ऑल ब्रीचेस’ (Mother of All Breaches) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या डेटा लीक प्रकरणात तब्बल २६ अब्ज रेकॉर्ड उघड झाल्याचे समोर आले होते. आताच्या दोन्ही घटनांमुळे पुन्हा एकदा इंटरनेटवरील वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे युजर्सनी आपले पासवर्ड सुरक्षित ठेवणे आणि ऑनलाइन अकाउंट्सच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here