Home ब्रेकिंग न्यूज Strait of Hormuz explosion : होर्मुझ सामुद्रधुनीत मोठा अपघात : पाण्याखालील बॉम्बला धडकून चार तेलवाहू जहाजांचा स्फोट

Strait of Hormuz explosion : होर्मुझ सामुद्रधुनीत मोठा अपघात : पाण्याखालील बॉम्बला धडकून चार तेलवाहू जहाजांचा स्फोट

0
Strait of Hormuz explosion : होर्मुझ सामुद्रधुनीत मोठा अपघात : पाण्याखालील बॉम्बला धडकून चार तेलवाहू जहाजांचा स्फोट

तेहरान : जगभरातील तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘होर्मुझ सामुद्रधुनी’ या सागरी मार्गावर मंगळवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. पाण्याखाली लपवलेल्या बॉम्बला (सागरी सुरुंगाला) धडकल्यामुळे चार तेलवाहू जहाजांमध्ये मोठे स्फोट होऊन त्यांना आग लागली आहे. इराणच्या सैन्याने आणि नौदलाने या घटनेची माहिती दिली असून, या भागात सध्या सुरू असलेल्या तणावामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलने नौदलाच्या हवाल्याने दिलेली माहिती अशी की, मंगळवारी सकाळी होर्मुझच्या सागरी मार्गावरून जाणारे एक तेलवाहू जहाज पाण्यातील बॉम्बवर आदळले. ही धडक इतकी जोरदार होती की जहाजाचा मोठा स्फोट झाला आणि या भागाच्या पूर्वेकडे जहाजाने पेट घेतला. या स्फोटाचा आवाज आणि धूर पाहून मागून येणारी इतर दोन तेलवाहू जहाजे घाबरली. तसेच, इराणच्या वाहतूक नियंत्रण केंद्राने त्यांना रेडिओवरून धोक्याचा इशारा दिला. त्यामुळे धोका टाळण्यासाठी या दोन्ही जहाजांनी तातडीने आपला मार्ग बदलला आणि ती पुन्हा ‘पर्शियन आखाताकडे’ (पर्शियन गल्फ) माघारी फिरली. या घटनेनंतर इराणच्या नौदलाने सर्व जहाज मालकांना कडक इशारा दिला आहे. “कोणीही चुकीच्या किंवा परवानगी नसलेल्या मार्गाने जहाजे नेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्यांचा असाच स्फोट होऊन ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडतील,” असे नौदलाने स्पष्ट केले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/25/miss-universe-2026-winner-puerto-rico-jennifer-barreto-mother-of-7-year-old-daughter-creates-history-at-75th-pageant/

दुसरीकडे, इराणी नौदलाने आणखी एका घटनेची माहिती दिली आहे. ज्या भागात जहाजांना जाण्यास बंदी आहे, अशा प्रतिबंधित क्षेत्रात इतर दोन तेलवाहू जहाजांनी प्रवेश केला. त्या भागात शिरण्यापूर्वी या जहाजांनी आपली ओळख पटवणारी आणि रस्ता दाखवणारी यंत्रणा (नेव्हिगेशन सिस्टीम) जाणूनबुजून बंद ठेवली होती. त्यामुळे ती पाण्यातील बॉम्बला धडकली, त्यांना आग लागली आणि ती जागीच बंद पडली. इराणच्या नौदलाने या प्रकरणी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. “जोपर्यंत इराणच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हा सागरी मार्ग पूर्णपणे रिकामा किंवा खुला केला जाणार नाही. या मार्गावरून सुरक्षित प्रवास करायचा असेल, तर सर्व जहाज मालकांनी आधी इराणच्या सैन्याची परवानगी आणि संपर्क साधणे आवश्यक आहे,” असा दम इराणने भरला आहे. दरम्यान, या घटनेच्या दोन दिवस आधी म्हणजेच रविवारीही या सागरी भागात हल्ल्याची घटना घडली होती. ब्रिटनच्या सागरी व्यापार संस्थेने (UKMTO) दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझ मार्गावरून पूर्वेकडे जाणाऱ्या तीन व्यापारी जहाजांवर अज्ञात क्षेपणास्त्रांसारख्या वस्तूंनी हल्ला झाला होता.

रविवारी रात्री घडलेल्या या घटनेची माहिती उशिरा समोर आली. या हल्ल्यानंतरही तिन्ही जहाजांनी आपला प्रवास थांबवला नाही आणि ती पुढे निघून गेली. यातील सर्व कर्मचारी सुखरूप आहेत. मात्र, या हल्ल्यात जहाजांचे किती नुकसान झाले किंवा समुद्रात तेल गळती होऊन पर्यावरणाची काही हानी झाली का, हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या या सर्व घटनांचा तपास सुरू आहे. या भागातून प्रवास करणाऱ्या सर्व जहाजांनी अत्यंत सावध राहावे आणि काही संशयास्पद दिसल्यास त्वरित कळवावे, असा सल्ला देण्यात आला आहे. एकूणच, पश्चिम आशियातील वाढत्या वादामुळे समुद्रमार्गे होणारी तेल वाहतूक मोठ्या संकटात सापडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here