येवला : नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन लाल कांद्याची आवक सुरू होताच, कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपयांची घट झाली असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
https://www.prahaar.in/2026/11/25/firing-at-punes-shivajinagar-court-granted-bail-four-days-ago-murdered-outside-the-court-today-shooting-incident-causes-a-stir-in-pune/
मागील आठवड्यापर्यंत येवला बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल ४,००० ते ४,१०० रुपयांपर्यंत चांगला दर मिळत होता. मात्र, बाजारात नवीन लाल कांद्याची आवक सुरू होताच हे दर खाली आले आहेत. सध्या कांद्याला सरासरी ३,६०० ते ३,७०० रुपये प्रतिक्विंटल इतकाच बाजारभाव मिळत आहे. अचानक झालेल्या या दर घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. केवळ येवलाच नाही, तर आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतही कांद्याचे भाव गडगडले आहेत. येथील बाजार समितीतही कांद्याची आवक वाढल्याने दरावर मोठा परिणाम झाला असून, शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडली आहे.
यावर्षी आधीच अपुऱ्या पावसामुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पाणीटंचाई आणि बदलत्या हवामानामुळे कांद्याच्या उत्पादनात आधीच मोठी घट झाली आहे. त्यातच मशागत, बियाणे, खते आणि मजुरीचा खर्चही प्रचंड वाढला आहे. अशा कठीण परिस्थितीत पीक वाचवून बाजारात आणल्यानंतर आता भाव घसरल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कांद्याला किमान उत्पादन खर्चावर आधारित अपेक्षित बाजारभाव मिळवून द्यावा, अशी आर्त मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.