Home महाराष्ट्र पेपरफुटीप्रकरणी १० कोटींचा दंड, १० वर्षांपर्यंत कारावासाची शिफारस

पेपरफुटीप्रकरणी १० कोटींचा दंड, १० वर्षांपर्यंत कारावासाची शिफारस

0
पेपरफुटीप्रकरणी १० कोटींचा दंड, १० वर्षांपर्यंत कारावासाची शिफारस

मुंबई : राज्यातील भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी तसेच अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची शिफारस उच्चस्तरीय समितीने केली आहे. पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकारांमध्ये सहभागी व्यक्ती व संस्थांना किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि सात ते दहा वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद करण्याची सूचना समितीने आपल्या दुसऱ्या अहवालात केली आहे. त्याचबरोबर परीक्षेतील अनुचित साधनांचा वापर, गैरप्रकारांना मदत करणाऱ्या सेवा पुरवठादार संस्था आणि तपास प्रक्रियेबाबतही कठोर उपाय सुचवण्यात आले आहेत.

भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने ४ सप्टेंबर २०२६ रोजी उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीचा दुसरा अहवाल २३ नोव्हेंबर रोजी शासनाला सादर करण्यात आला. त्यामध्ये पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करण्याची शिफारस करण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती आणि संस्थांना सात ते दहा वर्षांचा कारावास, किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद सुचवण्यात आली आहे. परीक्षेत अनुचित साधनांचा वापर करणाऱ्यांना पाच ते दहा वर्षांचा कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड करण्याची शिफारस आहे. गैरप्रकारात सहभागी असलेल्या सेवा पुरवठादार संस्थांना पाच कोटी रुपयांपर्यंत दंड आणि आठ वर्षांसाठी बंदी घालण्याची सूचना करण्यात आली आहे.

परीक्षा गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्याबरोबरच गंभीर प्रकरणांसाठी विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन करण्याची शिफारसही अहवालात आहे. अशा प्रकरणांमधील खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्याची सूचनाही समितीने केली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/24/mastermind-behind-the-mpsc-paper-leak-is-an-official-from-within-the-commission-itself-it-is-alleged-that-300-questions-were-typed-out-on-a-laptop-charge-sheet-has-been-filed-against-six-accused/

अहवालातील शिफारशी

– दुसरीकडे, परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना दिलासा देणाऱ्या शिफारशीही अहवालात करण्यात आल्या आहेत. परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याची तरतूद सुचवण्यात आली आहे. उत्तरतालिकेवर उमेदवाराने घेतलेली हरकत योग्य ठरल्यास त्यासाठी भरलेले शुल्कही परत मिळणार आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर करावे, अशी सूचना करण्यात आली आहे. उमेदवारांना आधार किंवा महाआयडीच्या माध्यमातून एकदाच नोंदणी करता येईल, अशी व्यवस्था उभारण्याची शिफारसही आहे.

– परीक्षा प्रक्रियेवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. रिक्त पदांची माहिती वेळेत उपलब्ध होऊन भरती प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबवता यावी, यासाठी एकात्मिक मागणी पोर्टल (इंटिग्रेटेड रिक्विझिशन पोर्टल) विकसित करण्याची सूचना आहे. संबंधित विभागांनी सप्टेंबरअखेरपर्यंत भरतीचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवावे, असेही सुचवण्यात आले आहे.

– परीक्षा आयोजनाच्या विकेंद्रीकरणावरही समितीने भर दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र परीक्षा शाखा स्थापन करावी, परीक्षा केंद्रांची स्वतंत्र बँक तयार करावी आणि केंद्रांची निवड व व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवावी, अशा शिफारशी करण्यात आल्या आहेत. परीक्षा प्रक्रियेतील सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करण्याची सूचनाही अहवालात आहे.

https://www.prahaar.in/2026/11/24/amit-shah-and-sukhbir-singh-badal-will-held-press-conference-alliance-likely-possible-in-bjp-and-akali-dal/

हिवाळी अधिवेशनात विधेयक आणणार – मुख्यमंत्री

– पेपरफुटी आणि परीक्षा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विद्यमान कायदा अधिक कठोर करण्याबरोबरच परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करण्यावर राज्य सरकारचा भर आहे. उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात परीक्षा केंद्रांची व्यवस्था, परीक्षा शुल्क आणि अन्य प्रशासकीय सुधारणांबाबत महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. या शिफारशींच्या आधारे परीक्षा सुधारणा विधेयक याच अधिवेशनात मांडून मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

– मुख्यमंत्री म्हणाले, “व्ही. राधा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश होता. समितीचा आणखी एक अहवाल आम्हाला प्राप्त झाला असून, त्यामध्ये परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक करण्यासाठी कोणत्या व्यवस्था उभाराव्यात, परीक्षा केंद्रांची व्यवस्था कशी असावी, याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. परीक्षा शुल्काबाबतही समितीने महत्त्वाची शिफारस केली आहे. परीक्षेतील गांभीर्य कायम राहावे, यासाठी उमेदवारांनी शुल्क भरावे; मात्र परीक्षा दिल्यानंतर ते शुल्क परत करावे, अशी ही सूचना आहे. त्यामुळे उमेदवारांवर आर्थिक बोजा पडणार नाही. याशिवाय, मागील काळात केलेला कायदा अधिक कठोर करण्यासाठी नव्या कडक कायद्याची शिफारसही समितीने केली आहे. याच अधिवेशनात हे विधेयक आणता आले, तर ते मांडून मंजूर करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here