भारत न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर दुसऱ्या सामन्याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागल्या आहे. दुसरा कसोटी सामना क्राईस्टचर्च येथे होणार असून मालिकेचा निकाल या सामन्यावर अवलंबून आहे. पहिला सामना ड्रॉ झाल्याने दोन सामन्यातील मालिका आता 0-0 ने बरोबरीत आहे. त्यामुळे आता मालिका कोण जिंकणार? याची उत्सुकता आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने करो या मरोची लढाई टीम इंडियासाठी आहे. अशा स्थितीत टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे भारता विरुद्धच्या दुसऱ्या महत्त्वाच्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. टिकनरच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. वेलिंग्टनमध्ये सराव करताना टिकनरच्या उजव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली. त्यामुळे क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही.
मॅट फिशरला मिळाली संधी
न्यूझीलंडचा महत्त्वाचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि मर्यादित षटकांच्या फॉरमॅटचा कर्णधार मिचेल सँटनर आधीच दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. आता सहा कसोटी सामन्यांत 22 बळी मिळवणारा टिकनरही क्राइस्टचर्च कसोटीतून बाहेर पडल्यामुळे, भारताच्या तगड्या फलंदाजीचा सामना करण्यासाठी न्यूझीलंडकडे अनुभवी वेगवान गोलंदाजांची कमतरता जाणवणार आहे. ब्लेअर टिकनरच्या जागी वेगवान गोलंदाज मॅट फिशरचा 14 सदस्यीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत फिशरने प्रभावी कामगिरी केली होती. त्याने तीन सामन्यांत 13.66 च्या सरासरीने सहा बळी घेतले होते, ज्यामध्ये 31 धावा देत 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. फिशरला क्राइस्टचर्चमध्ये आपल्या कारकिर्दीतील दुसरी कसोटी खेळण्याची संधी मिळू शकते.
https://www.prahaar.in/2026/11/23/fans-outraged-over-mohammed-siraj-exclusion-from-the-first-test-match-captain-shubman-gill-finally-breaks-his-silence/
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत काय स्थिती?
वेलिंग्टन कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे न्यूझीलंडला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतून दुसऱ्या स्थानावरून खाली यावे लागले आहे. आता क्राइस्टचर्चमध्ये सकारात्मक निकाल मिळवून पुन्हा एकदा आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न न्यूझीलंड संघ करेल. भारत सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत 50 टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. भारताला उर्वरित सहा कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करण्याची गरज आहे. यापैकी पाच सामने पुढील वर्षी जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात खेळले जाणार आहेत.