सरकारने करसवलती, व्यापार करार आणि उद्योगपूरक धोरणांतून उद्योगजगतासाठी संधींची दारे खुली केली आहेत. आता रोजगारनिर्मिती, वेतनवाढ, संशोधन आणि गुंतवणुकीतून उद्योगांनीही देशाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असा स्पष्ट संदेश पंतप्रधानांनी दिला.
ज्या व्यासपीठावर सरकारची प्रशंसा करण्याची सवय असते तिथे टाळ्याच वाजल्या नाहीत, असा प्रसंग राजधानी दिल्लीत पार पडला. ‘फिक्की’च्या वार्षिक अधिवेशन उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगजगताला सरकारने दिलेल्या सवलतींचा पाढा वाचला आणि सभागृह शांत बसले. ही शांतता त्या दिवशीची खरी बातमी होती. कारण सरकारने दिले काय आणि बदल्यात मिळाले काय या दोन्ही बाजू एकाच व्यासपीठावर मांडल्या गेल्या तेव्हा उत्तर कोणाला द्यायचे हा प्रश्न पहिल्यांदाच इतका थेट उभा राहिला. भाषणाचा सूर केवळ कौतुकाचा नव्हता तर उद्योगांना अधिक जबाबदारी घेण्यासाठीच्या कानपिचक्याही होत्या. उद्योगक्षेत्रासाठी सरकारच्या बाजूने जे काही झाले, ते पंतप्रधानांनी आकड्यांसह मांडले. २०१४ मध्ये ३० टक्के असलेला कॉर्पोरेट कराचा मूळ दर २२ टक्क्यांवर आणला गेला. बारा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कर नाही. पूर्वी आठ महिने लागणारे कर परतावे आता साधारणपणे आठवडाभरात जमा होतात. वस्तू आणि सेवा करसुधारणेने अनेक वस्तूंवरचा कर ओसरला, मागणी वाढली आणि त्याचा थेट फायदा उद्योगांना मिळाला. जगातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांसोबत झालेल्या व्यापार करारांनी निर्यातीची दारे उघडली. आता सरकारचा सरळसोपा युक्तिवाद आहे, आम्ही उद्योगधंद्यासाठी हवे ते वातावरण उभे केले, आता उद्योगाने उचल घ्यावी. त्यानंतर आलेल्या प्रश्नांची धार वेगळीच होती. तुमच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का? माणसे वाढवली का? आणि त्यावरचे उत्तर पंतप्रधानांनीच दिले – नाही.
सवलतीचा फायदा तुमच्या ताळेबंदात गेला, हेही खरे. मग उद्योगाची भूमिका काय राहिली? ‘मोदीजी, तुम्ही करा, आम्ही बघू’? याच धर्तीवर आणखी एक सवाल – मोठ्या अर्थव्यवस्थांबरोबरच्या व्यापार करारांवर ‘फिक्की’ने कधी डोके एकत्र घातले का? आणि सर्वांत चमत्कारिक प्रश्न – देशातील ग्राहकाला आजही ‘निर्यात दर्जा’ असे सांगून विक्री करावी लागते तेव्हा आपण आपल्याच माणसांचा काय समज करून घेतला आहे? परदेशासाठी जो माल, तोच आपल्या माणसासाठी का नाही? ‘फिक्की’ची शताब्दी साजरी होत असतानाच पंतप्रधानांनी १९३० चा दाखला दिला. गांधीजींनी त्यावर्षी उद्योगासमोर स्वदेशीचा संदेश ठेवला होता. शंभर वर्षे लोटल्यावरही तेच नव्याने सांगावे लागत असेल तर हे यश आहे की अपयश? माझे नका ऐकू, पण गांधींचे ऐका, असे म्हणत पंतप्रधानांनी शताब्दीमहोत्सवाला उत्सवाऐवजी आत्मपरीक्षणाची बैठक बनवले. १९७० च्या दशकातील ‘गरिबी हटाओ’चा उल्लेखही त्याच अर्थाने आला. त्यावेळी देशाची लोकसंख्या सुमारे पन्नास कोटी होती; आता बारा-तेरा वर्षांत पन्नास कोटी लोक दारिद्र्याबाहेर आल्याचे जागतिक बँकेच्या अहवालात नमूद झाले आहे. धोरण आणि नियत दोन्ही जुळल्यास काय साध्य होते, याचे हे मोजमाप आहे. उद्योगाच्या उणीवांची यादीही पंतप्रधानांनी क्षेत्रनिहाय दिली. औषधनिर्मितीत आपण जगाची औषधालये आहोत, तरी सक्रिय घटकद्रव्ये आणि मध्यस्थ घटकांच्या अब्जावधी डॉलरच्या आयातीवर अवलंबून आहोत. लोखंडखनिजाची निर्यात करून पक्के पोलाद आयात करतो. बॉक्साइटचे प्रचंड साठे असताना विशेष अॅल्युमिनियम मिश्रधातू बाहेरून येतात. गहू निर्यात करून पाव आयात करणारा हा कसला देश, असा प्रश्न त्यांनी थेट केला. हे केवळ नैतिक उपदेश नाहीत तर अर्थकारणाचाच मुद्दा आहे. देशाची मागणी वाढते ती पगार वाढल्याने आणि पगार वाढतात तेव्हा उद्योगालाच मोठा बाजार मिळतो. करसवलतीचा पैसा गुंतवणुकीत न जाता तिजोरीत साठला तर मागणीचा तो प्रवाह खंडित होतो आणि त्याची किंमत नंतर उद्योगालाच मोजावी लागते. दरवर्षी कोट्यवधी नवे हात कामाच्या शोधात बाजारात येतात आणि त्यांना सामावून घेण्याचे काम मुख्यत्वे उद्योगाचे आहे. ते नाही झाले तर केवळ बेरोजगारीच वाढत नाही तर बाजारपेठेची ताकदच खुंटते. संधींचे रूपांतर सामर्थ्यात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, नवकल्पना आणि कौशल्यांची गरज आहे. जगभरातील ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास करा, पथके पाठवा, उत्पादनांचे नकाशे तयार करा, स्थानिक आवडीनुसार रंग-आकार ठरवा, जागतिक दर्जा राखा आणि वितरणजाळे उभारा, या पंतप्रधानांचा आवाहनाचा अर्थ सोपा आहे. संशोधन, नवकल्पना, कौशल्यविकास आणि उत्पादनक्षमता यावर उद्योगाने सातत्याने खर्च केला तरच भारतीय मालाची किंमत आणि दर्जा या दोन्ही बाबी टिकतील.
देशातील संशोधनावरचा खर्च अजूनही राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत नगण्य आहे आणि तो खर्च सरकार एकट्याने वाढवू शकत नाही. उद्योगानेच आपल्या नफ्यातील काही भाग नव्या कल्पनांमध्ये ओतला पाहिजे. कौशल्याची बाबही तशीच. सर्व धागे ‘भारत प्रथम’ या एका मागणीत एकवटतात. पुढील वीस वर्षांच्या प्रत्येक दीर्घकालिक गुंतवणूक निर्णयाचा पाया ‘भारत प्रथम’ असावा. संसाधनांचे शस्त्रीकरण होत असलेल्या जगात आत्मनिर्भरता ही केवळ आर्थिक सोय नसून राष्ट्रीय सुरक्षेची बाब आहे, हे त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे सूत्र होते. स्वयंपूर्ण भारत, मेक इन इंडिया, निर्यातवाढ आणि २०४७ पर्यंतचा विकसित भारत ही उद्दिष्टे एकाच साखळीतील कड्या आहेत आणि त्या साखळीतील सर्वांत मजबूत कडी उद्योगाची आहे. जगातील सर्वांत वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था, सुमारे सात टक्के वाढीचा अंदाज, ऑक्टोबरमध्ये जवळपास पन्नास अब्ज डॉलरची विक्रमी मालनिर्यात आणि मूडीज, एस अँड पी, फिच, जागतिक बँक व आशियाई विकास बँक अशा संस्थांकडून वाढीच्या अंदाजात करण्यात आलेल्या सुधारणा. सरकारने आपली बाजू पुरी केली आहे; आता उद्योगाच्या ताळेबंदातून रोजगार, पगार, संशोधन आणि गुंतवणूक या स्वरूपात उत्तर यायला हवे. शेवटी मुद्दा एवढाच आहे. सरकारने दारे उघडली, रस्ते केले आणि करांची ओझी हलकी केली. आता त्या कमानीखालून बाहेर पडून जगाच्या बाजारपेठेत उभे राहणे उद्योगाचे काम आहे. पुढचे दशक अपेक्षा मांडण्याचे नाही, तर देणी फेडण्याचे आहे.