नाशिक : नाशिक तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत दिलासा मिळावा, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी नाशिक तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीची गांभीर्याने दखल घेत मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून नाशिक तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
नाशिक तालुक्यात यंदा पावसाचे असमान वितरण झाले असून अनेक भागांमध्ये अपेक्षित पर्जन्यमान झालेले नाही. त्यातच पावसात वारंवार खंड पडल्याने शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर परिणाम होत आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. तसेच ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता यांसारखे प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे.
https://www.prahaar.in/2026/11/24/fraudulent-godman-arun-patil-arrested-he-had-promised-to-cure-illnesses-and-bring-a-windfall-of-money-into-peoples-homes/
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक लोकसभा अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या प्रतिनिधींनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. यावेळी नाशिक तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याची मागणी करण्यात आली.नागरिकांच्या मागणीची गंभीर दखल घेत मंत्री भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच तालुक्यातील पर्जन्यमान, पीक परिस्थिती, शेतीचे संभाव्य नुकसान, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून आवश्यक निकषांनुसार सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते.
प्रशासनाकडून शासनाकडे प्रस्ताव सादर
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्देशानंतर जिल्हा प्रशासनाने आवश्यक कार्यवाही पूर्ण करत नाशिक तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश झाल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा आणि मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे आता शासन या प्रस्तावावर काय निर्णय घेते, याकडे नाशिक तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.