Home साप्ताहिक अर्थविश्व Gold-Silver Rate : सोने-चांदीच्या दरात पुन्हा तेजी ! एकाच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ‘इतकी’ वाढ

Gold-Silver Rate : सोने-चांदीच्या दरात पुन्हा तेजी ! एकाच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ‘इतकी’ वाढ

0
Gold-Silver Rate : सोने-चांदीच्या दरात पुन्हा तेजी ! एकाच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ‘इतकी’ वाढ

जळगाव : दिवाळीपासून सातत्याने घसरत असलेल्या सोने आणि चांदीच्या दरांना अखेर ब्रेक लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली दरातील घसरण थांबून सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाली. विशेष म्हणजे, जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत बाजार उघडताच सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम २ हजार ५९६ रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो ४ हजार १२० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच झालेल्या या दरवाढीमुळे दागिने खरेदीच्या तयारीत असलेल्या ग्राहकांचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे.

सोन्याच्या दरात एका दिवसात २,५९६ रुपयांची वाढ

जळगाव शहरात शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख २८ हजार ३५८ रुपयांपर्यंत खाली आला होता. मात्र, सोमवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात २ हजार ५९६ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख ३० हजार ९५४ रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीनेही घेतली मोठी उसळी

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. शनिवारी चांदीचा दर जीएसटीसह प्रति किलो १ लाख ५८ हजार ६२० रुपयांपर्यंत घसरला होता. सोमवारी बाजार सुरू होताच चांदीच्या दरात ४ हजार १२० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे चांदीचा भाव जीएसटीसह प्रति किलो १ लाख ६२ हजार ७४० रुपयांवर पोहोचला आहे.

https://www.prahaar.in/2026/11/23/5682-investors-whose-money-was-stuck-in-the-nsel-scam-will-receive-a-refund/

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा दरांवर परिणाम

गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. मार्च महिन्यानंतरची ही सर्वात मोठी घसरण मानली जात होती. सोन्याच्या दराने नीचांकी पातळी गाठल्यानंतर चांदीच्या किमतीतही मोठी घट झाली होती. मात्र, कमी झालेल्या किमतींचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदी सुरू केल्याने दोन्ही धातूंच्या दरात सुधारणा झाली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरविषयक अपेक्षा, डॉलर निर्देशांकातील चढ-उतार आणि तांत्रिक खरेदी यांचा या तेजीवर परिणाम झाल्याचे मानले जात आहे.

ग्राहकांसमोर खरेदीचा पेच, पुढे दर काय राहणार?

दिवाळीनंतर सोन्याच्या दरात १९ हजार रुपयांहून अधिक, तर चांदीच्या दरात ३३ हजार रुपयांहून अधिक घसरण झाली होती. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, सोमवारी अचानक झालेल्या दरवाढीमुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसमोर पुन्हा पेच निर्माण झाला आहे.

आगामी काळात अमेरिकेतील व्याजदरविषयक निर्णय, डॉलरची स्थिती, कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक आर्थिक घडामोडींनुसार सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी दागिने खरेदी करताना विविध ठिकाणच्या दरांची तुलना करावी. तसेच हॉलमार्क, सोन्याची शुद्धता, घडणावळ आणि जीएसटी यांची माहिती घेऊनच खरेदी करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here