Home महाराष्ट्र नाशिक Nashik : TCS प्रकरणातील निदा खानच्या संसारात वादळ ! संसार वाचवण्यासाठी निदाची धडपड, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुसरे समुपदेशन

Nashik : TCS प्रकरणातील निदा खानच्या संसारात वादळ ! संसार वाचवण्यासाठी निदाची धडपड, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुसरे समुपदेशन

0
Nashik : TCS प्रकरणातील निदा खानच्या संसारात वादळ ! संसार वाचवण्यासाठी निदाची धडपड, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुसरे समुपदेशन

नाशिक : टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या निदा एजाज खान (वय २६) हिच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठे वादळ निर्माण झाले आहे. या प्रकरणातील गंभीर आरोप आणि त्यातून निर्माण झालेल्या सामाजिक बदनामीच्या पार्श्वभूमीवर निदाच्या पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र, पतीने घटस्फोटाची भूमिका घेतली असली, तरी निदा खानने संसार टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवल्याचे समोर आले आहे.

निदाच्या पतीने नाशिकरोड येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी झालेल्या दुसऱ्या समुपदेशनावेळी निदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पती घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले जात असताना निदाकडून मात्र वैवाहिक नाते टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दाम्पत्याचे पुढील समुपदेशन १९ जानेवारी रोजी होणार आहे. या प्रकरणात निदाच्या वतीने अ‍ॅड. शोभा प्रकाश ताजनपुरे आणि अ‍ॅड. प्रकाश ताजनपुरे बाजू मांडत आहेत, तर तिच्या पतीच्या वतीने अ‍ॅड. नितीन पंडित काम पाहत आहेत.

नेमकं TCS प्रकरण काय ?

टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर आणि अत्याचाराच्या प्रकरणांमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मुंबई नाका पोलीस ठाण्यात कंपनीतील एका तरुणाच्या तक्रारीवरून तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन यांच्यासह निदा खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कंपनीतील एका तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान यांच्यासह अन्य संशयितांची नावे आहेत. तपासादरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल, घरमालक हानिफ शेख तसेच निदाच्या कुटुंबातील सदस्यांसह इतरांचीही नावे समोर आली आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/21/accused-of-poor-hygiene-licenses-of-four-hotels-in-nashik-city-suspended/

दोन्ही प्रकरणांत निदाला सशर्त जामीन

या प्रकरणांच्या तपासादरम्यान निदा खानला न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले. मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यांतील दोन्ही प्रकरणांमध्ये नाशिकरोड आणि नाशिक जिल्हा न्यायालयाकडून तिला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणांतील इतर संशयितांविरोधातही तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

१९ जानेवारीच्या समुपदेशनाकडे लक्ष

एकीकडे गंभीर गुन्ह्यांच्या तपासाचे आणि न्यायालयीन लढाईचे सावट, तर दुसरीकडे वैवाहिक आयुष्यात निर्माण झालेला तणाव, अशा दुहेरी परिस्थितीला निदा खान सामोरी जात आहे. पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असला, तरी निदाकडून संसार वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. आता १९ जानेवारी रोजी होणाऱ्या पुढील समुपदेशनात काय घडते, पती-पत्नीमधील मतभेद मिटतात की घटस्फोटाच्या दिशेने पुढील प्रक्रिया सुरू होते, याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here