Home ब्रेकिंग न्यूज PM SVANidhi : PM स्वनिधी पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्राची बाजी; राज्याला 5 राष्ट्रीय पुरस्कार

PM SVANidhi : PM स्वनिधी पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्राची बाजी; राज्याला 5 राष्ट्रीय पुरस्कार

0
PM SVANidhi : PM स्वनिधी पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्राची बाजी; राज्याला 5 राष्ट्रीय पुरस्कार

Maharashtra News: पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM स्वनिधी) योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या ‘PM स्वनिधी सन्मान पुरस्कार 2026’ सोहळ्यात महाराष्ट्राला 2, तर छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि परळी या शहरांना प्रत्येकी 1 असे एकूण 5 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त अमोल येडगे यांनी पुरस्कार स्वीकारला.

https://www.prahaar.in/2026/11/20/unauthorized-minor-mineral-excavation-leads-to-trouble-orders-issued-to-register-cases-against-52-individuals-and-companies-in-thane/

कर्ज वितरणात महाराष्ट्र देशात प्रथम

पुनर्रचित PM स्वनिधी योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज वितरित करण्याच्या कामगिरीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत राज्याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि परळीचा गौरव

कर्ज वितरणाच्या कामगिरीसाठी लोकसंख्येनुसार शहरांची श्रेणी ठरवण्यात आली होती. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरने 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात तृतीय क्रमांक मिळवला. 1 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात परभणीने, तर 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात परळीने प्रथम क्रमांक पटकावला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्दिष्टाच्या 204 टक्के पूर्तता

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने PM स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीत निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक कामगिरी केली आहे. शहरासाठी 23,502 पथविक्रेत्यांना प्रथम कर्ज देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. प्रत्यक्षात 47,950 पथविक्रेत्यांना प्रथम कर्ज वितरित करण्यात आले. त्यामुळे 204 टक्के उद्दिष्टपूर्ती झाली.

17 नोव्हेंबर 2026 पर्यंत शहरातील 65,091 पथविक्रेत्यांना एकूण 100.05 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. तसेच 38,690 पथविक्रेते डिजिटल व्यवहारांसाठी सक्रिय झाले आहेत. या कामगिरीमुळे महापालिकेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

काय आहे PM स्वनिधी योजना?

PM स्वनिधी योजनेची सुरुवात 1 जून 2020 रोजी करण्यात आली. या योजनेद्वारे पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून दिले जाते. केंद्र सरकारने ऑगस्ट 2025 मध्ये योजनेची पुनर्रचना करून मार्च 2030 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

पुनर्रचित योजनेत कर्जमर्यादा वाढवणे, पात्र लाभार्थ्यांना UPI शी संलग्न RuPay क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देणे आणि योजनेची व्याप्ती निमशहरी भागांपर्यंत वाढवणे अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत.

‘स्वनिधी से समृद्धी’ उपक्रमांतर्गत पथविक्रेत्यांच्या कुटुंबांना केंद्र सरकारच्या 8 कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. सुलभ कर्जपुरवठा, डिजिटल व्यवहार आणि आर्थिक समावेशनाच्या माध्यमातून पथविक्रेत्यांना सक्षम करण्याचा या योजनेचा उद्देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here