Home महाराष्ट्र नाशिक Nashik : नाशिकमध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर रडारची नजर ! 7 महिन्यांत 39 हजार वाहनांवर कारवाई

Nashik : नाशिकमध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर रडारची नजर ! 7 महिन्यांत 39 हजार वाहनांवर कारवाई

0
Nashik : नाशिकमध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर रडारची नजर ! 7 महिन्यांत 39 हजार वाहनांवर कारवाई

नाशिक : रस्त्यावरून वेगाने गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे किंवा सीट बेल्टकडे दुर्लक्ष करणे आता वाहनचालकांना चांगलेच महागात पडू शकते. कारण नाशिक जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता आधुनिक रडार यंत्रणेच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या तीन रडार इंटरसेप्टर वाहनांनी गेल्या सात महिन्यांत तब्बल ३९ हजार १३५ वाहनांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या कारवाईतून सुमारे ७ कोटी ८४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मोटार वाहन विभागाकडून मोबाइल ट्रॅफिक एन्फोर्समेंट सिस्टीम अर्थात एमडीईएस-रडार यंत्रणा राबविण्यात येत आहे. या आधुनिक प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्रे, महामार्ग आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष ठेवले जात आहे.

विनाहेल्मेट वाहनचालक सर्वाधिक कारवाईच्या कचाट्यात

एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. अशा तब्बल २९ हजार २०७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तर अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या ९ हजार ३८८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. याशिवाय एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या ६ हजार ८६४ वाहनांवर, विनासीट बेल्ट वाहन चालविणाऱ्या ३ हजार ४८२ जणांवर आणि ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या १ हजार ६९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये एकूण सुमारे ७ कोटी ८४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही वाहनचालकांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित करण्याची कारवाईही केली जात आहे.

https://www.prahaar.in/2026/11/19/audio-clip-adds-a-twist-to-the-nashik-tcs-case-imtiaz-jaleel-to-appear-in-court-today/

रडार यंत्रणेची कुठे असणार नजर ?

जिल्ह्यातील महामार्ग, अपघातप्रवण ठिकाणे आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांवर रडार यंत्रणायुक्त वाहनांद्वारे तपासणी केली जात आहे. यामध्ये वेगमर्यादेचे उल्लंघन, हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर न करणे, दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे, नियमानुसार नंबर प्लेट नसणे तसेच वाहनांची आवश्यक कागदपत्रे नसणे अशा नियमभंगाच्या प्रकारांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.

वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, वाहनांची आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत आणि ई-चलनाद्वारे प्रलंबित असलेला दंड तातडीने भरावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी केले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाशिकच्या रस्त्यांवर वाहन चालवताना आता केवळ पोलिसांनाच नव्हे, तर आधुनिक रडार यंत्रणेलाही चकवा देणे शक्य होणार नाही. सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करणेच वाहनचालकांच्या हिताचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here