Home ब्रेकिंग न्यूज Nitesh Rane vs Rohit Pawar : रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्याची हिंमत करू नये! मंत्री नितेश राणेंचा इशारा

Nitesh Rane vs Rohit Pawar : रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्याची हिंमत करू नये! मंत्री नितेश राणेंचा इशारा

0
Nitesh Rane vs Rohit Pawar : रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्याची हिंमत करू नये! मंत्री नितेश राणेंचा इशारा

पवार कुटुंबीयांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

मुंबई : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मंगळवारी खरपूस शब्दांत समाचार घेतला. रोहित पवार हे पवार कुटुंबाचे रक्त आहे का, असा प्रश्न पडावा, अशा पद्धतीने त्यांचे वक्तव्य असल्याची टीका राणे यांनी केली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल रोहित पवार पूर्वी काय बोलत होते, याचे ध्वनिमुद्रण आणि पुरावे दाखवण्याची वेळ आली आहे. रोहित पवार हे राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे वक्तव्य करत असून, राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) ही अधिकृत भूमिका आहे की ते स्वतःहून बोलत आहेत, हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट करावे, अशी मागणीही राणे यांनी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केलेली वक्तव्ये पाहता ते पवार कुटुंबातीलच आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राजकीय प्रवास आणि महाराष्ट्रातील त्यांचे काम पाहिले, तर त्यांनी राजकारणापलीकडील संबंध आणि माणुसकी जपली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे वैयक्तिक संबंध होते, आहेत. मात्र, त्यांनी कधीही या संबंधांना राजकारणाशी जोडले नाही. रोहित पवार यांनी मात्र मुख्यमंत्र्यांचे नाव अशा पद्धतीने जोडून खालच्या स्तराचे राजकारण केले आहे. स्वतःला पवार म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही. आम्ही यापूर्वी रोहित पवार यांना मित्र आणि भाऊ मानत होतो; पण आता राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांनाही मागे टाकत त्यांनी स्वतःचे प्रदर्शन सुरू केले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/17/delhi-vivek-vihar-old-house-roof-collapse-several-feared-trapped/

रोहित पवार यांनी कोणाचे नाव कोणाशी जोडायचे, याचा विचार करावा. त्यांनी स्वतः किती वेळा व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केला, त्या कंपनीच्या पार्टीमध्ये त्यांचे किती मित्र आणि कुटुंबीय सहभागी होते, याची यादी आता आम्हाला दाखवावी लागेल. अजितदादांबद्दलचे प्रेम त्यांनी सांगू नये. अजितदादा हयात असताना त्यांच्याबद्दल रोहित पवार वैयक्तिक पातळीवर काय बोलत होते, याचे ध्वनिमुद्रण आमच्याकडे आहे. अजितदादांबद्दल त्यांनी किती द्वेष व्यक्त केला, याचे पुरावेही आम्ही दाखवण्यास तयार आहोत. अजितदादांना एकेरी भाषेत संबोधणे आणि त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये करणे, हे सर्व आम्हाला माहीत आहे. त्यामुळे आता अजितदादांबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार त्यांनी सांगू नये, असे राणे म्हणाले.

रोहित पवार यांच्या एमपीएससी आंदोलनाच्या वेळी त्यांच्या मदतीला त्यांचे कुटुंबीयही आले नव्हते; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याबाबत आदराची भूमिका ठेवली आणि मदत केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी काय केले, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना किमान माणुसकी तरी ठेवावी. जास्त मफलर-मफलर केले आणि पुन्हा मुख्यमंत्र्यांचे नाव अशा प्रकारे घेतले, तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. पुढच्या वेळी मुख्यमंत्र्यांचे नाव घेण्याची हिंमत करू नये, असा इशाराही राणे यांनी दिला.

रोहित पवार यांनी यापूर्वी अजितदादांबद्दल एकेरी भाषेत वक्तव्ये केली आणि त्यांना वेगवेगळी नावे ठेवली. त्यासंदर्भातील पुरावे आमच्याकडे आहेत. रोहित पवार यांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तेथे दरवाजे बंद झाल्यानंतर आता ते अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत. एमपीएससीच्या आंदोलनाच्या वेळी राहुल गांधीही त्यांच्या मदतीला आले नाहीत. त्यामुळे काल पत्रकार परिषद घेऊन काहीतरी मोठे केल्याचे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते असे बोलत आहेत. पवार कुटुंबाशी त्यांचे नेमके नाते काय, याचीही आता तपासणी व्हावी, असा टोलाही मंत्री राणे यांनी लगावला.

रोहित पवारांनी स्वतःला आरशात पहावे!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आरोप करण्यापूर्वी रोहित पवार यांनी स्वतःला आरशात पहावे. शरद पवार यांचे राजकारण आणि त्यांची माणुसकी यांचा रोहित पवार यांना अंदाज नाही. अजितदादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक संबंध किती जिव्हाळ्याचे होते, हे त्यांना कळणार नाही. रोहित पवार स्वतः मंत्रालयात किती वेळा येऊन मुख्यमंत्र्यांकडून आपली कामे करून घेतात, याचेही भान त्यांनी ठेवावे. राजकारणात राजकीय टीका होत असते आणि ती सर्वांना मान्य आहे; मात्र राज्याच्या प्रमुखांवर अशा पद्धतीने वैयक्तिक आरोप करणे योग्य नाही. त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी याबाबत बोलण्याची गरज आहे. रोहित पवार यांची वक्तव्ये ही राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) अधिकृत भूमिका आहे की ते स्वतःहून अशी वक्तव्ये करत आहेत, हे पक्षाच्या नेतृत्वाने स्पष्ट करावे, अशी मागणी राणे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here