Political News: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस आणि राहुल गांधी एसआयआर प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करत असताना, काँग्रेसच्या सत्ताकाळात झालेल्या अशाच प्रक्रियांबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजप नेते ॲड. आशिष शेलार यांनी केली. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर, भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, माध्यम प्रमुख गोविंद येतेयेकर आणि प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी उपस्थित होते.
काँग्रेसने संसदेत प्रश्न का उपस्थित केले नाहीत?
काँग्रेसकडून एसआयआर प्रक्रियेबाबत 39 प्रश्न उपस्थित करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप शेलार यांनी केला. राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते आणि खासदार म्हणून संसदेत या विषयावर चर्चा घडवून आणण्याची संधी होती. मात्र, त्यांनी या प्रश्नांवर संसदेत चर्चा का केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एसआयआर प्रक्रियेबाबत काँग्रेसच्या बूथ लेव्हल एजंट्सनी (BLO) निवडणूक यंत्रणेकडे किती तक्रारी केल्या, किती सूचना दिल्या आणि किती वेळा माहिती मागितली, याची माहिती राहुल गांधी यांनी द्यावी, असे आव्हानही शेलार यांनी दिले.
काँग्रेसच्या काळात 12 वेळा एसआयआर झाल्याचा दावा
काँग्रेसच्या सत्ताकाळात 12 वेळा एसआयआर प्रक्रिया राबवण्यात आली होती, असा दावा शेलार यांनी केला. त्यावेळी या प्रक्रियेवर आक्षेप का घेण्यात आले नाहीत आणि आता त्याच प्रक्रियेवर प्रश्न का उपस्थित केले जात आहेत, असा सवाल त्यांनी केला.
एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदारांना तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना हरकती नोंदवण्याची आणि सुनावणी मागण्याची संधी असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या बीएलए-2 प्रतिनिधींनी किती मतदारांना या अधिकारांची माहिती दिली आणि किती मतदारांसाठी सुनावणीची मागणी केली, याचे उत्तर काँग्रेसने द्यावे, असे ते म्हणाले.
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरूनही सवाल
मतदारांची पात्रता, मतदार याद्या आणि निवडणूक लढवण्यासंदर्भातील तरतुदी भारतीय संविधान आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यात आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात या कायद्यांमध्ये कोणते बदल करण्यात आले, याची माहिती राहुल गांधी यांनी द्यावी, अशी मागणी शेलार यांनी केली.
तसेच काँग्रेसच्या सरकारच्या काळात मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोणत्या पद्धतीने केली जात होती आणि त्यावेळी तीन सदस्यीय समितीची व्यवस्था होती का, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
तीन कोटी मतदारांबाबत शेलार यांचा आरोप
एसआयआरच्या निमित्ताने काँग्रेस सुमारे तीन कोटी अवैध किंवा अपात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप शेलार यांनी केला. भारतीय नागरिक नसलेल्या व्यक्तींची किंवा अपात्र मतदारांची नावे मतदार यादीत राहावीत, अशी काँग्रेसची भूमिका आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
न्यायालयीन प्रक्रियेचा आदर राखला पाहिजे; मात्र जनतेमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण होऊ नये, असे शेलार म्हणाले. काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांप्रमाणेच भाजपने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची उत्तरेही राहुल गांधी, काँग्रेस आणि महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी जनतेसमोर द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले.