Home मनोरंजन Lokparampara Mahotsav: लोककलेच्या रंगाविष्काराने गिरगावात रंगला ‘लोकपरंपरा महोत्सव’!

Lokparampara Mahotsav: लोककलेच्या रंगाविष्काराने गिरगावात रंगला ‘लोकपरंपरा महोत्सव’!

0
Lokparampara Mahotsav: लोककलेच्या रंगाविष्काराने गिरगावात रंगला ‘लोकपरंपरा महोत्सव’!

मुंबई( सुहास शेलार): महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा, लोककलेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा सुरेख आविष्कार गिरगावातील साहित्य संघ मंदिरात अनुभवायला मिळाला. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि. 13 व 14 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकपरंपरा महोत्सवा’ने दोन दिवस मुंबईकरांना पारंपरिक लोककलांच्या बहारदार सादरीकरणाची सांस्कृतिक मेजवानी दिली.

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे वैविध्य, परंपरेतील कलात्मकता आणि लोककलावंतांच्या सादरीकरणातील अस्सलपणा या महोत्सवाच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडला. पहिल्या दिवशी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. लोककलेचे गाढे अभ्यासक सदानंद राणे, मुंबई लोककला अकादमीचे सहप्राध्यापक डॉ. शिवाजी वाघमारे तसेच ज्येष्ठ पत्रकार आणि लोककलेचे अभ्यासक खंडूराज गायकवाड आणि नगरसेवक कमलाकर दळवी यांनी आवर्जून उपस्थिती लावली.(Lokparampara2026)

https://www.prahaar.in/2026/11/16/minister-nitesh-rane-reviews-the-mukhyamantri-matsyasampada-yojana-emphasizes-the-implementation-of-22-schemes/

महोत्सवाची सुरुवात पारंपरिक ‘नमन’ या लोककलेच्या सादरीकरणाने झाली. नमनच्या मंगलमय स्वरांनी आणि पारंपरिक कलाविष्काराने महोत्सवाचे वातावरण भारावून गेले. लोकपरंपरेतील या कलाप्रकाराने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मातीशी जोडलेली नाळ पुन्हा एकदा अधोरेखित केली.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘दादला नको गं बाई’ या लोकनाट्याने रसिकांचे मनोरंजन केले. त्यानंतर कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचे वैशिष्ट्य असलेल्या दशावतार लोककलेच्या माध्यमातून ‘तुळशी विवाह’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, अभिनय, संगीत आणि लोककलेच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून तुळशी विवाहाचे धार्मिक व सांस्कृतिक महात्म्य प्रेक्षकांसमोर उलगडण्यात आले. या सादरीकरणातून केवळ एका धार्मिक परंपरेचे दर्शन घडले नाही, तर लोककलेच्या माध्यमातून पिढ्यान्‌पिढ्या जपल्या गेलेल्या सांस्कृतिक वारशाचीही प्रचिती आली.

https://www.prahaar.in/2026/11/16/central-government-job-opportunity-upsc-recruitment-for-13-group-a-posts-apply-online-by-4-december/

या दोन दिवसीय महोत्सवाच्या यशस्वी आयोजनामागे सम्यक कलांश प्रतिष्ठानचे संयोजक शशांक बामनोलकर यांचे विशेष योगदान राहिले. दोन दिवस कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन, कलावंतांशी समन्वय आणि सादरीकरणाची आखणी यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनातून लोककलेविषयीची आस्था आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करण्याची तळमळ प्रकर्षाने जाणवली.(Girgaon)

राज्यातील विविध लोककलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, लोककलावंतांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणि नव्या पिढीपर्यंत लोकपरंपरेचा समृद्ध वारसा पोहोचावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर आणि सहसंचालक श्रीराम पांडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

एकंदरीत, ‘लोकपरंपरा महोत्सव’ हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम न ठरता महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा, परंपरेचा आणि लोककलावंतांच्या सर्जनशीलतेचा उत्सव ठरला. काळाच्या ओघात काहीशा मागे पडत चाललेल्या लोककलांना नव्याने प्रकाशझोतात आणण्याचे आणि रसिकांना आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या महोत्सवाने केले.(Girgaon Culture)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here