Home महत्वाची बातमी Amit Shah: अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान; अमित शाह यांचे वक्तव्य

Amit Shah: अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान; अमित शाह यांचे वक्तव्य

0
Amit Shah: अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान; अमित शाह यांचे वक्तव्य
(Photo: Twitter/x)

पुणे (सुहास शेलार): “अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. ते काम करणारे आणि काम करून घेणारे नेते होते. मात्र, काम करणारा हा माणूस वेळेआधीच आपल्यातून निघून गेला. त्यांनी कामाची जी पद्धत निर्माण केली, त्यातील वेळेचे नियोजन आणि शिस्त ही येणाऱ्या काळात तरुणांसाठी एका विद्यापीठाप्रमाणे ठरेल,” अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार यांच्या महायुतीत सहभागी होण्याच्या निर्णयावेळी आपण आश्चर्यचकित झालो होतो, असे सांगत त्या निर्णयामागील त्यांची भूमिका आणि त्यानंतर निर्माण झालेले आपले संबंध यांचाही शाह यांनी उल्लेख केला.(Maharashtra Politics)

https://www.prahaar.in/2026/11/16/amit-shah-meets-with-mahayuti-leaders-in-the-backdrop-of-union-cabinet-expansion/

पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्याचा कार्यक्रम अमित शाह यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना शाह म्हणाले, “अजितदादांनी महायुतीसोबत येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला थोडे आश्चर्य वाटले होते. मी त्यांना विचारले होते की, दादा, तुमची एक राजकीय पार्श्वभूमी आहे. या निर्णयामुळे जनतेला आणि सर्वांनाच धक्का बसेल. मग तुम्ही एवढा मोठा निर्णय का घेत आहात? सत्ता येते आणि जाते. त्यासाठी तुम्ही असा निर्णय का घेत आहात? त्यावर त्यांनी सांगितले की, प्रत्येक गोष्टीचा एक कालखंड असतो. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यामुळे आता देशाचा विकास आणि महायुती या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवता येणार नाहीत. मला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हायचे आहे. त्यामुळे मला महायुतीचा सदस्य व्हायचे आहे. यासाठी दोन-तीन वेळा प्रयत्न झाले, थोडा उशीरही झाला; मात्र अखेर अजितदादा हयात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा सदस्य झाला.(Ajit Pawar)

“महायुतीत आल्यानंतर अजितदादांशी माझे संबंध अधिक घनिष्ट झाले. त्यानंतर महाराष्ट्रातील निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी माझ्याशी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी आग्रही चर्चा केली. आपल्या कार्यकर्त्यांसाठी चिवटपणे भूमिका मांडणारे नेते फार कमी असतात. एखादा नेता वरिष्ठ पदावर पोहोचल्यानंतर अनेकदा तो आपल्या नातेसंबंधांचा विचार करतो; मात्र अजितदादांनी नेहमी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी असलेल्या नात्याला प्राधान्य दिले. कार्यकर्त्यांशी निष्ठा राखण्याचा त्यांचा हा गुण आपण सर्वांनी शिकण्यासारखा आहे”, असे अमित शाह म्हणाले.(Pune)

https://www.prahaar.in/2026/11/16/two-little-girls-were-made-to-get-off-a-bus-in-the-darkness-of-the-night-the-driver-and-conductor-have-been-suspended/

“अजितदादांच्या महायुतीतील सहभागामुळे सरकारला स्थिरता आणि सातत्य मिळाले. त्यामुळे महायुती सरकार कठोर निर्णय घेऊ शकले आणि महाराष्ट्रातील सरकारचा कारभार सुरू राहिला. मात्र, अचानक दादा आपल्यातून निघून गेले. सकाळी साडेआठच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला. घटनेची प्राथमिक माहिती देताना जखमींच्या वाचण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी सांगितले. ती माहिती ऐकल्यानंतर मी मनाने आणि हृदयाने सुन्न झालो. एवढा मोठा माणूस अशा दुर्घटनेचा बळी ठरला, यावर विश्वास बसत नव्हता. एक काम करणारा माणूस वेळेआधीच निघून गेला, हे महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान आहे. ते काम करणारे होते आणि कामाचेही होते. ईश्वराने त्यांना वेळेआधीच आपल्याजवळ बोलावून घेतले, याचे दुःख आपल्या सर्वांनाच आहे. त्यांनी केलेले काम आणि कामाची जी पद्धत निर्माण केली, त्यात वेळेचे महत्त्व आणि शिस्त होती. त्यांची ही कार्यशैली येणाऱ्या काळात तरुणांसाठी एका मोठ्या विद्यापीठाप्रमाणे ठरेल, असा मला विश्वास आहे,” असे शाह यांनी सांगितले.(IrreparableLoss)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here