Home महाराष्ट्र नाशिक Nashik Crime : 13 दिवसांपासून बेपत्ता अल्पवयीन मुलीची नाशिकमध्ये सुटका, 34 वर्षीय विवाहित तरुणाला अटक

Nashik Crime : 13 दिवसांपासून बेपत्ता अल्पवयीन मुलीची नाशिकमध्ये सुटका, 34 वर्षीय विवाहित तरुणाला अटक

0
Nashik Crime : 13 दिवसांपासून बेपत्ता अल्पवयीन मुलीची नाशिकमध्ये सुटका, 34 वर्षीय विवाहित तरुणाला अटक

नाशिक : मुंबईतून बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अंबड युनिट-३ पथकाला यश आले आहे. तब्बल १३ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या मुलीला नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरातून पोलिसांनी सुखरूप ताब्यात घेतले.

या प्रकरणी मुलीला फूस लावून सोबत नेल्याच्या आरोपावरून मुंबईतील ३४ वर्षीय विवाहित तरुणाला अटक करण्यात आली आहे. संशयिताने मुलीला तिरुपती बालाजीसह विविध तीर्थक्षेत्रांवर नेल्याची माहिती तपासात समोर आली आहे. प्रशांत ऊर्फ रवी गायकवाड (वय ३४, रा. पोस्टल कॉलनी, चेंबूर पूर्व, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

परीक्षा देऊन घरी परतली अन्…

मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूर पूर्व परिसरात राहणारी १६ वर्षे ८ महिन्यांची मुलगी माटुंगा येथील महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी महाविद्यालयाची परीक्षा संपल्यानंतर ती घरी परतली होती. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या आजीच्या घरी जेवण केल्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. विशेष म्हणजे, मुलीने तिचा मोबाईल फोन घरीच ठेवला होता. त्यामुळे तिच्याशी संपर्क साधणे कुटुंबीयांसाठी कठीण झाले. सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने कुटुंबीयांनी ३१ ऑक्टोबर रोजी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

https://www.prahaar.in/2026/11/14/nashik-creating-fake-videos-on-social-media-proves-costly-nashik-police-take-action-against-three-individuals-including-a-woman/

देवदर्शनाच्या नावाखाली चार राज्यांत प्रवास

पोलिसांच्या तपासात संशयित प्रशांत गायकवाड हा मुलीच्या नातलगांच्या घराजवळील परिसरात राहत असल्याचे समोर आले. तो विवाहित असूनही त्याने अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून आपल्यासोबत नेल्याचा आरोप आहे. मुलीला सोबत घेऊन त्याने आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, गाणगापूर आणि ओडिशातील जगन्नाथ पुरी अशा विविध तीर्थक्षेत्रांना भेट दिल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर पोलिसांचा सापळा

बेपत्ता मुलगी नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या अंबड युनिट-३ चे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी (दि. १२ नोव्हेंबर) रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. पोलीस अंमलदार गौरव धात्रक यांनी मुलीला ओळखल्यानंतर महिला पोलिसांच्या मदतीने तिला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. यावेळी तिच्यासोबत असलेल्या प्रशांत गायकवाड यालाही पोलिसांनी अटक केली.

पुढील तपासासाठी दोघांनाही मुंबई पोलिसांच्या ताब्यात

मुलीची सुटका केल्यानंतर संशयितासह तिला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि गुन्हे शाखेच्या पथकाने या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. नाशिक शहर गुन्हे शाखेच्या या तत्पर कारवाईमुळे १३ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here