अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिन भागात बुधवारी दुपारी एका तीन मजली इमारतीचा भाग कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही एक व्यक्ती अडकलेली असून तिच्याशी बचाव पथकाचा संपर्क सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ब्रुकलिनमधील फ्लॅटबुश भागात, बेडफोर्ड अव्हेन्यू आणि फ्लॅटबुश अव्हेन्यूजवळ घडली. २६२५ बेडफोर्ड अव्हेन्यू, न्यूकिर्क आणि फ्लॅटबुश अव्हेन्यूच्या दरम्यान असलेल्या या इमारतीचा काही भाग दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. इमारत ही निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही वापरासाठी होती. त्यामुळे घटनेच्या वेळी इमारतीत अनेक लोक उपस्थित होते.
इमारतीचा भाग कोसळल्यानंतर छतापासून ते पहिल्या मजल्यापर्यंतच्या खोल्या उघड्यावर आल्या. हवाई दृश्यांमध्ये इमारतीच्या आतल्या खोल्या बाहेरून स्पष्ट दिसत होत्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या दृश्यांवरून दुर्घटनेची भीषणता लक्षात येते. घटनेची माहिती मिळताच न्यूयॉर्क अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगारा हटवून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. जखमी झालेल्या अनेक बांधकाम कामगारांना तातडीने किंग्ज काउंटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
https://www.prahaar.in/2026/11/12/in-mumbai-a-total-of-499-fire-incidents-occurred-over-five-days-as-many-as-333-of-these-were-caused-by-firecrackers/
बचाव कार्य अद्याप सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीशी बचाव पथक सतत संपर्कात आहे. त्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर इतर कोणी ढिगाऱ्याखाली अडकले आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, न्यूयॉर्क पोलीस विभागाने नागरिकांना या भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. बेडफोर्ड अव्हेन्यू आणि फ्लॅटबुश अव्हेन्यू परिसरातील अनेक रस्ते बंद करण्यात आले असून वाहतुकीला विलंब होत आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. इमारत नेमकी कशामुळे कोसळली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. इमारतीत बांधकाम सुरू होते का, किंवा संरचनात्मक बिघाड झाला होता का, याचा तपास अधिकारी करत आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.