त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या अंजनेरी शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बेझे धरणात आंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये वडील आणि त्यांच्या दोन लहान मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघेरे येथील रहिवासी असलेले भोर कुटुंबीय उत्तम चव्हाण यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. दरम्यान, आज सकाळी सुमारे ९:३० ते १०:३० वाजेच्या दरम्यान ते बेझे धरण परिसरात आंघोळीसाठी गेले होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. या दुर्घटनेत सुरेश नामदेव भोर (वय ४२), ज्योती सुरेश भोर (वय १०) आणि हर्षदा सुरेश भोर (वय ७) यांचा मृत्यू झाला.
https://www.prahaar.in/2026/11/11/big-news-terrorist-attack-on-a-crpf-post-in-kulgam-jammu-and-kashmir-two-soldiers-injured/
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाच्या मदतीने तिघांनाही पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत तिघांचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील वडील आणि दोन चिमुकल्या मुलींचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने वाघेरे आणि अंजनेरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून, घटनेची माहिती त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदारांनी दिली आहे.