Home ब्रेकिंग न्यूज US-Iran : अमेरिका-इराणमध्ये पुन्हा चर्चेचे संकेत ! इराणच्या 7 अटींमुळे पेच मात्र कायम

US-Iran : अमेरिका-इराणमध्ये पुन्हा चर्चेचे संकेत ! इराणच्या 7 अटींमुळे पेच मात्र कायम

0
US-Iran : अमेरिका-इराणमध्ये पुन्हा चर्चेचे संकेत ! इराणच्या 7 अटींमुळे पेच मात्र कायम

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरु आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा चर्चेचे प्रयत्न सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणने कतारच्या माध्यमातून अमेरिकेकडे अणुकरारासंदर्भातील एक नवा प्रस्ताव पाठवला आहे. इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

मात्र, या प्रस्तावावर चर्चा करण्यापूर्वी अमेरिकेने आपल्या सात प्रमुख अटी मान्य कराव्यात, अशी भूमिका इराणने घेतली आहे. इराणच्या अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, अमेरिकेकडून सध्या या प्रस्तावाचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे वॉशिंग्टनकडून यावर नेमकी काय भूमिका घेतली जाते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

इराणच्या 7 अटी पूर्ण झाल्याशिवाय चर्चा नाही

इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी मोहसिन रजाई यांनीही गुरुवारी देशाची भूमिका स्पष्ट केली. रशिया दौऱ्यादरम्यान त्यांनी सांगितले की, इराणने अमेरिकेसमोर सात अटी ठेवल्या आहेत. या अटी पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही, तसेच होर्मुझची सामुद्रधुनीही खुली केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

इराणने अमेरिकेसमोर ठेवलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे.

1. अमेरिकेचे आर्थिक निर्बंध हटवा: इराणवर लादलेले आर्थिक आणि व्यापारविषयक निर्बंध उठवावेत.

2. गोठवलेली संपत्ती परत द्या: परदेशात अडकवलेली इराणची आर्थिक संपत्ती मुक्त करावी.

3. युद्धाची नुकसानभरपाई द्या: संघर्षामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अमेरिकेने करावी.

4. नौदलाची नाकेबंदी संपवा: इराणविरोधातील अमेरिकेची नौदल नाकेबंदी हटवावी.

5. अमेरिकी सैन्य माघारी घ्या: संबंधित क्षेत्रातून अमेरिकन सैन्य मागे बोलवावे.

या सात मागण्यांपैकी काही प्रमुख अटींचा तपशील समोर आला असला, तरी अमेरिकेने अद्याप त्या मान्य केलेल्या नाहीत.

अमेरिकेची भूमिका वेगळी , अणुकार्यक्रमावर चर्चेचा आग्रह

दुसरीकडे, अमेरिकेने या चर्चेबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. कोणतीही प्राथमिक चर्चा सुरू करायची असल्यास त्यामध्ये इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दा समाविष्ट असणे आवश्यक असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.त्यामुळे दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू होण्यापूर्वीच महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतभेद निर्माण झाले आहेत. इराणने आर्थिक निर्बंध, नुकसानभरपाई आणि अमेरिकी सैन्याच्या माघारीवर भर दिला आहे, तर अमेरिकेला अणुकार्यक्रमाबाबत स्पष्ट भूमिका हवी आहे.

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता ?

दरम्यान, दोन्ही देशांमधील संघर्ष संपवण्यासाठी मध्यस्थ देशांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अमेरिकेतील मिडटर्म निवडणुकांनंतर पुन्हा एकदा लष्करी संघर्ष सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी केलेल्या वक्तव्यात मिडटर्म निवडणुकांनंतर पुन्हा लष्करी कारवाई सुरू करण्याची शक्यता नाकारलेली नाही.

दुसरीकडे, इराणनेही युद्ध पुन्हा सुरू झाल्यास यापूर्वीपेक्षा अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे कतारमार्फत पाठवण्यात आलेला प्रस्ताव दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र, प्रत्यक्ष चर्चा कधी सुरू होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

28 फेब्रुवारीपासून सुरू झाला होता संघर्ष

अमेरिका आणि इस्रायलने 28 फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केला होता. त्यानंतर इराणने इस्रायलसह ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकी लष्करी तळ आहेत, त्या ठिकाणांना लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले.या संघर्षाची व्याप्ती पुढे लेबनॉनपर्यंत पोहोचली. इराणसमर्थित हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यातही लढाई सुरू झाली. त्यानंतर येमेनमधील हुथी बंडखोरही या संघर्षात सहभागी झाले. त्यांनी सौदी अरेबियातील ऊर्जा प्रकल्प, विमानतळ आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले.

जगाचे लक्ष अमेरिका-इराणच्या पुढील निर्णयाकडे

कतारच्या माध्यमातून इराणने अमेरिकेला पाठवलेल्या नव्या प्रस्तावामुळे राजनैतिक चर्चेचा मार्ग पुन्हा खुला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, इराणच्या सात अटी आणि अमेरिकेचा अणुकार्यक्रमावरील आग्रह यामुळे तोडगा काढणे सोपे नसल्याचे दिसत आहे.आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या प्रस्तावावर काय निर्णय घेतात आणि इराणसोबत चर्चेची प्रक्रिया पुढे जाते की पुन्हा लष्करी संघर्षाला सुरुवात होते, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here