रविवारी (1 नोव्हेंबर) नाहूर पश्चिम येथील नालंदा बुद्ध विहार हॉलमध्ये आयोजित एका लग्नसमारंभात अन्नातून विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी कारवाई करत ‘कलश कॅटरर्स’चे मालक मूलसिंग हरिसिंग राजपुरोहित यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा येथील रहिवासी आरती शिरसाठ (30) आणि सूरज वानखेडे (31) यांचा 1 नोव्हेंबर रोजी लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी सुमारे 400 ते 500 पाहुणे उपस्थित होते. समारंभादरम्यान शेवटच्या टप्प्यात जेवलेल्या पाहुण्यांपैकी सुमारे 70 ते 100 जणांना अचानक उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्रास झालेल्यांमध्ये नववधू आणि वराचाही समावेश होता.
तब्येत बिघडल्याने बाधित पाहुण्यांना तातडीने मुलुंड आणि विक्रोळी परिसरातील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोमवारी मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 31 रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू होते. यापैकी मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल पालिकेच्या सर्वसाधारण रुग्णालयात 5 रुग्ण उपचार घेत होते, तर उर्वरित बहुतांश रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. घटना घडल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) लग्नसोहळ्यातील अन्नाचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी जप्त केले आहेत. हे अन्न खरोखरच दूषित होते का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता वैद्यकीय अहवाल आणि प्रयोगशाळेच्या चाचणी निष्कर्षांची वाट पाहत आहेत. हा अहवाल आल्यानंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
https://www.prahaar.in/2026/11/02/mass-food-poisoning-at-a-wedding-in-bhandup-mumbai-29-guests-including-the-bride-and-groom-admitted-to-hospital/
या लग्नसोहळ्यातील जेवणाची संपूर्ण जबाबदारी ‘कलश कॅटरर्स’कडे सोपवण्यात आली होती. अन्नाचा दर्जा, स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या मानकांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत भांडुप पोलिसांनी कॅटरर्सचे मालक राजपुरोहित व इतर संबंधित व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या भांडुप पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कॅटरर्स मालकाची चौकशी केली जात आहे.