अहिल्यानगर (प्रतिनिधी) : आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार विकास पॅनल’ने दणदणीत विजय मिळवला आहे. बँकेच्या एकूण २१ जागांपैकी आधीच ११ जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकार विकास पॅनेलने ७ जागांवर विजय मिळवला. यांसह अपक्ष निवडून आलेल्या ज्येष्ठ नेते सीताराम गायकर यांच्या कन्या संजीवनी शिंदे यांनी पाठिंबा जाहीर केल्यामुळे, पॅनेलचे एकूण १८ संचालक आता बँकेत असणार आहेत. निवडणुकीत १८ जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या या पॅनेलने एकूण १७ जागांवर विजय मिळवत बँकेवर आपली एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे, तर विरोधी गटाच्या सभापती राम शिंदेंच्या दोन जागा आज विद्यमान नीलेश लंके यांचा जागा निवडून आल्या आहेत.
निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर शासकीय विश्रामगृहावर नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार सोहळा झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विजयाची माहिती दिली. या वेळी त्यांच्यासोबत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यासह नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. निवडणुकीतील सर्व मतभेद आता संपले असून, सर्वांना सोबत घेऊन बँकेचे आणि शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून एकत्रितपणे काम करणार असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले. तसेच, विरोधात गेलेल्या नेत्यांविषयी कोणताही राजकीय आकस ठेवणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. पारनेर येथील जागेबाबत बोलताना त्यांनी तो पराभव मान्य केला असून, ती जागा प्रतिष्ठेची केली नसल्याचे स्पष्ट करत संबंधित खासदारांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/03/bjp-wins-in-satara-congress-sharad-pawar-group-faces-tough-battle-in-sangli/
दरम्यान, बँकेच्या अध्यक्षपदाबाबत बोलताना डॉ. विखे यांनी आपली महत्त्वाकांक्षा उघडपणे व्यक्त केली. उपस्थित सर्व १८ संचालक अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे अध्यक्षपदावर दावा ठोकला. मात्र, याविषयीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असून, त्यांचा निर्णय अंतिम असेल, असे स्पष्ट करत त्यांनी अंतिम अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचे सांगितले. ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची नसून शेतकरी हिताची होती, असे सांगत सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी सर्व संचालकांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. निकालानंतर आता बँकेच्या आगामी सत्तावाटपात हे सर्व नेते कशी भूमिका बजावतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
खा. निलेश लंकेंनाही दिल्या शुभेच्छा
दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी नवनिर्वाचित संचालकांना शुभेच्छा देताना पारनेर मधून निवडून आलेले विद्यमान खासदार नीलेश लंके यांना देखील जिल्हा बँक निवडणुकीत विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. तर निवडणूक संपली असून आता सर्वांनाच सोबत घेऊन शेतकरी हितासाठी काम करणार असल्याचे विखे यांनी सांगितले.