मुंबई (सुहास शेलार ) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद झाल्याने शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांनी संताप व्यक्त केला. अर्ज बाद करण्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनाच्या दरवाजाला लाथा मारत नाराजी व्यक्त केली. राजकीय दबावातून आणि काही अदृश्य शक्तींच्या हस्तक्षेपामुळे आपला अर्ज बाद करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकारामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील वातावरण तापले आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सुमित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जावर भाजपचे सतीश शिंदे यांनी हरकत घेतली होती. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय समजल्यानंतर सुमित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सकाळी नऊ वाजल्यापासून आपण निवडणूक कार्यालयात उपस्थित असूनही अर्ज बाद केल्याच्या निर्णयाची प्रत देण्यासाठी अधिकारी उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी केला. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाला ‘शिवसेना स्टाइलने उत्तर देऊ’, असा इशाराही त्यांनी दिला. (Jalgaon District Bank Election)
https://www.prahaar.in/2026/11/03/tiger-shroff-news-mumbai-crime-branch-arrests-22-year-old-woman-in-tiger-shroff-shooting-case-number-of-accused-increases/
दरम्यान, सुमित पाटील यांचा अर्ज नियमानुसारच बाद करण्यात आल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विशाल ठाकूर यांनी स्पष्ट केले. अर्जावर घेण्यात आलेल्या हरकतींची छाननी करताना लेखापरीक्षण, संचालकपदाचा कार्यकाळ आणि निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या अन्य निकषांचा विचार करण्यात आला. त्यानुसारच अर्ज बाद करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सुमित पाटील यांनी राजकीय दबावाचा आरोप केला असला, तरी निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमांच्या आधारे निर्णय घेतल्याची भूमिका मांडली आहे.