मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे. खासदार पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर काही ज्येष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा असतानाच, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘एखादा निर्णय सगळ्यांनाच आवडतो असे नाही. मनातील गैरसमज दूर होत असतात,’ असे सूचक विधान केले. दुसरीकडे, पक्षात कोणतीही नाराजी नसून ही भेट पूर्वनियोजित आणि औपचारिक होती, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पवार यांनी केला आहे. त्यामुळे पक्षातील नाराजीच्या चर्चांवरून नेत्यांमध्ये वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि समीर भुजबळ यांनी सोमवारी (२ नोव्हेंबर) नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे या भेटीमागील कारणांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. ज्येष्ठ नेते पक्षातील निर्णयप्रक्रियेत डावलले जात असल्याने नाराज असल्याचे वृत्तही समोर आले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत फूट पडण्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.
https://www.prahaar.in/2026/11/03/pune-metro-enters-service-today-to-operate-across-17-stations-check-ticket-fares-and-the-timetable-here/
या भेटीबाबत बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठका नियमित होत असतात, चर्चा होत असते. एखादा निर्णय सगळ्यांनाच आवडतो असे नाही. मनातील गैरसमज दूर होत असतात. कालची बैठक संघटना मजबूत करण्यासंदर्भात आणि दुष्काळाच्या परिस्थितीबाबत झाली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे मला समजते, असे भरणे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांबाबत विचारले असता, ‘यासंदर्भात मला माहिती नाही. ज्येष्ठ नेतेच याबाबत उत्तर देतील,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले यांनी पक्षात पार्थ पवार यांच्याबाबत कोणतीही नाराजी नसल्याचे सांगितले. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सुनेत्रा पवार यांनी आमदारांची बोलावलेली बैठक ही अजित पवार यांच्या काळापासून सुरू असलेली नियमित बैठक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.