मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पर्यावरणाचे रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणासाठी अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) हिच्या माध्यमातून एक जनजागृतीपर व्हिडिओ प्रसारित केला आहे. प्रशासनाचा हा प्रयत्न नागरिकांना निसर्गाची काळजी घेण्याचे आवाहन करत असला, तरी यावरून आता राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी या मोहिमेवर आपली भूमिका मांडताना, “पर्यावरण आणि नियमांचे पालन सर्वांसाठी समान असावे,” असा मुद्दा उपस्थित करत नवीन चर्चेला तोंड दिले आहे.
“कायदा सर्वांसाठी समान असायला हवा” – संजय शिरसाट
https://www.prahaar.in/2026/11/03/expansion-of-pune-metro-will-give-new-momentum-to-the-citys-development-prime-minister-narendra-modis-statement/
दिया मिर्झाच्या व्हिडिओला कडाडून विरोध दर्शवताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले, “दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या सणात मर्यादा पाळल्या पाहिजेत आणि उच्च न्यायालयाचे आदेशही पाळले गेले पाहिजेत, यात दुमत नाही. मात्र, पर्यावरणाचा आणि प्रदूषणाचा मुद्दा फक्त हिंदूंच्या सणांपुरताच का आठवतो?” पुढे बोलताना शिरसाट म्हणाले, “मला सांगायचे आहे की, दिया मिर्झाने असाच व्हिडिओ मशिदींवरील भोंग्यांबाबतही करून दाखवावा. भोंग्यांमुळे ध्वनीप्रदूषण होत नाही का ? सर्वोच्च न्यायालयाने भोंगे बंद करण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही ते बंद का होत नाहीत ? फक्त हिंदूंच्याच सणांवर निर्बंध का लादले जातात ? आमचे एकच स्पष्ट मत आहे की कायदा सर्वांसाठी समान असायला हवा आणि कायद्याचा वापरही समानतेनेच व्हायला हवा.”
आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल : “२५ वर्षे काय केले ते सांगा ?”
विरोधी पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना संजय शिरसाट म्हणाले, “आदित्य ठाकरेंना केवळ आरोप करता येतात. आम्ही धर्माचे राजकारण कशाला करू? महापालिकेत २५ वर्षे ज्यांची सत्ता होती, त्यांची टक्केवारी आणि मलिदा आता बंद झाला आहे. त्यामुळेच त्यांची ही जळफळाट सुरू आहे. २५ वर्षांच्या सत्तेत त्यांनी मुंबईसाठी काय केले, याचे उत्तर आधी त्यांनी जनतेला द्यावे.”
‘आपला दवाखाना’ योजना बंद होणार नाही
राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांबाबत बोलताना शिरसाट यांनी स्पष्ट केले की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली कोणतीही योजना बंद होणार नाही. विरोधकांना केवळ एजन्सीला पैसे पोहोचले की नाही याची चिंता असते, पण आम्हाला गोरगरिबांच्या आरोग्याची चिंता आहे. ‘आपला दवाखाना’ ही योजना गोरगरिबांच्या आरोग्यासाठी असून ती कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही.”