Rupali Bhosale : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले हिला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील भूमिकेमुळे रुपाली घराघरात पोहोचली. मात्र, अभिनयासोबतच तिचे खासगी आयुष्यही अनेकदा चर्चेचा विषय ठरले आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाल्यानंतर रुपालीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. याच काळात शेफ पराग कान्हेरे याच्यासोबतच्या तिच्या जवळिकीचीही चर्चा झाली होती. दरम्यान, रुपालीच्या पहिल्या लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
सात वर्षांनंतर पहिला संसार मोडला
मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली भोसले हिने पहिलं लग्न लंडनमधील एका उद्योजकाशी केलं होतं. मात्र, दोघांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. लग्नाच्या सात वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. या घटनेनंतर रुपाली पुन्हा भारतात परतली आणि तिने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले.
https://www.prahaar.in/2026/11/01/janhvi-kapoors-nagina-avatar-for-halloween-a-special-tribute-to-her-mother-sridevis-iconic-look/
‘मी डेट करत आहे…’
घटस्फोटानंतर आयुष्यात पुन्हा प्रेमाला स्थान दिल्याचं रुपालीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा करताना तिने आपल्या लग्नाच्या निर्णयाबाबतही मनमोकळेपणाने भाष्य केलं होतं. रुपाली म्हणाली होती, “मी डेट करत आहे… मी रिलेशनशिपमध्ये आहे. मलाही आयुष्यात पुढे जायचं आहे. पण जोपर्यंत संकेतचं (रुपालीचा भाऊ) सर्व काही व्यवस्थित होत नाही आणि त्याचं लग्न होत नाही, तोपर्यंत मला माझ्या लग्नाचा विचार करता येणार नाही.” पुढे ती म्हणाली होती की, आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीने तिच्या कुटुंबालाही आपलं मानलं पाहिजे. आई-वडिलांची जबाबदारी ही आपली असल्याचं सांगत तिने भविष्यातील जोडीदाराकडूनही कुटुंबाबद्दल समजूतदारपणाची अपेक्षा व्यक्त केली होती.
कुटुंबाची जबाबदारी आधी, लग्नाचा विचार नंतर
रुपालीने आपल्या मुलाखतीत कुटुंबाला असलेलं महत्त्वही स्पष्ट केलं होतं. तिच्या मते, आयुष्यात जोडीदार येणं महत्त्वाचं असलं तरी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आनंदी असणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे भावाचं आयुष्य व्यवस्थित स्थिरस्थावर झाल्यानंतरच स्वतःच्या लग्नाचा विचार करणार असल्याचं तिने सांगितलं होतं.दरम्यान, रुपाली भोसले सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या विविध फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मालिका आणि चित्रपटांमधील भूमिकांमुळे तिने मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.