भारताने सलग तीन सामन्यात न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे चौथ्या टी20 सामन्यात भारताचा सहज विजय होईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय काही भारताच्या पथ्यावर पडला नाही. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा पुरेपूर फायदा लुटला. तसेच भारतीय संघाला बॅकफूटवर ढकललं. न्यूझीलंडने 20 षटकात 7 गडी गमवून 259 धावा केल्या आणि विजयासाठी 260 धावांचा आव्हान दिलं. भारताने विजयी धावांचा पाठलाग करताना 20 षटकात 9 गडी गमवून 172 धावांपर्यंत मजल मारली आणि सामना 87 धावांनी गमावला. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजीतही वरचढ ठरला. हा भारताने कुठे गमावला? असा प्रश्न श्रेयस अय्यरला सामन्यानंतर विचारला. तेव्हा त्याने या पराभवासाठी गोलंदाजांना जबाबदार धरलं.
काय म्हणाला कर्णधार श्रेयस अय्यर?
पराभवाचं विश्लेषण करताना श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘मला वाटतं की सुरुवातीला आमच्या गोलंदाजीत थोडी कमतरता होती. पॉवरप्लेमध्ये, विशेषतः तिसऱ्या षटकात, तिथून पुढे त्यांनी वेग पकडला. काही गोलंदाजांनी संधी साधण्याचा प्रयत्न केला, पण मला वाटतं ग्लेनची खेळी विलक्षण होती. काही अप्रतिम फटके, जे निव्वळ स्वर्गसुख देणारे होते. त्यामुळे त्याचं कौतुक करायलाच हवं. तो संपूर्ण मालिकेत सातत्यपूर्ण राहिला आहे, त्यामुळे त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. मला वाटतं की गोलंदाजीचं आत्मपरीक्षण करणं महत्त्वाचं आहे, हॅमिल्टनमध्ये येऊन फक्त एक दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर आपण कुठे पुनरागमन करू शकतो हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे मला वैयक्तिकरित्या वाटतं की आपण पुन्हा नव्याने सुरुवात करून विश्लेषण करू शकतो आणि पुढच्या सामन्यात आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू शकतो.’
https://www.prahaar.in/2026/10/30/ind-vs-nz-4th-t20-new-zealand-rewrites-history-in-auckland-in-the-fourth-match-defeats-india-by-87-runs/
तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितींशी कसे जुळवून घेता आणि काय चर्चा करता? या प्रश्नावर श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘चर्चा फक्त एवढीच होती की, आम्हाला माहित होतं की मैदानाचे आकारमान असे असणार आहे. त्यांच्यापैकी काही जण पहिल्यांदाच अशा मैदानांवर खेळत आहेत. त्यामुळे या आव्हानाशी जुळवून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागतो. हे इतकं सोपं नाही, हे मला समजतं, पण ज्या प्रकारे त्यांनी पहिले तीन सामने खेळले, ते अप्रतिम होतं. मला वाटतं की हा एक शिकण्याचा टप्पा आहे, की पुढच्या वेळी जेव्हा ते इथे येतील, तेव्हा त्यांना आपलं काम कसं करायचं याची कदाचित अधिक चांगली कल्पना असेल. त्यामुळे हा एक उत्तम शिकण्याचा टप्पा आहे, आणि आशा आहे की पुढच्या सामन्यात आम्ही सकारात्मकतेने परत येऊ.’