गेल्या काही दिवसांपासून जिओच्या शेअर्सची बाजारात जोरदार चर्चा रंगली होती. अनेकांनी हा आयपीओ मिळावा, यासाठी अर्जही केला होता. कारण हा आयपीओ फायदा मिळवून देईल, असा विश्वास गुंतवणूकदारांना होता. त्यामुळेच या आयपीओसाठी जवळपास 1 कोटींहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. आयपीओची किंमत प्रति शेअर 1119 इतकी होती. जिओ प्लॅटफॉर्मचा 30213 कोटींचा आयपीओ 22.19 पट सबक्रिप्शनसह बंद झाला, त्यातला काही भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. त्यामुळे शेअर बाजारात हा शेअर लिस्ट होतात काय करणार? याची उत्सुकता गुंतवणूकदारांना होती. 28 ऑक्टोबरला शेअर बाजारात जिओच्या शेअर्सची एन्ट्री झाली आणि 21.36 टक्के मजबूत प्रीमियमसह पदार्पण केले. हा शेअर बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी 1358 रुपयांवर सूचीबद्ध झाला. त्यामुळे मेटा, अलीबाबा आणि स्पेसएक्स यांच्यानंतर जिओ प्लॅटफॉर्म ही आयपीओच्या वेळी 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्यांकन प्राप्त करणारी जगातील चौथी संस्थापक नेतृत्व असलेली कंपनी ठरली. कंपनीचा 30213 कोटींचा आयपीओ हा इश्यूच्या आकारानुसार भारतातील सर्वात मोठा आयपीओ ठरला.
गुंतवणूकदारांना मोठा फायदा
जिओ शेअर्स बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. आकडेवारीवरून नेमका काय फायदा झाला? हे समजून घेऊयात. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या एका लॉटमध्ये 12 शेअर्स होते. एका शेअर्सची किंमत 1119 रुपये होती. म्हणजेच 12 शेअर्साठी 13428 रुपये मोजावे लागले. कंपनीचे शेअर्स बाजारात लिस्ट होताच त्याची किंमत 1358 रुपये प्रति शेअर झाली. म्हणजेच गुंतवणूदारांच्या एका लॉटचे मूल्य 16296 रुपये झाले. म्हणजेच गुंतवणूकदारांना प्रति लॉट 2868 रुपयांचा फायदा झाला. जिओच्या शेअर्समध्ये इश्यू किमतीवर गुंतवणूक होती, त्या हिशेबाने हे गणित मांडलं आहे.
https://www.prahaar.in/2026/10/28/jio-platforms-ipo-listing-strong-debut-for-jio-shares-investors-gain-this-much-profit-per-lot-immediately-upon-listing/
जिओमध्ये रिलायल्स इंडस्ट्रीजचा किती हिस्सा?
जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची 66.43 टक्के हिस्सेदारी आहे. मेटाची 9.99 टक्के, गुगलची 7.73 टक्के, सौदी अरेबिया वेल्थ फंड्सची 2.31 टक्के, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सची 2.31 टक्के, सिल्व्हर लेकची 1.88 टक्के, मुबाडालाची 1.85 ट्केक, जीए सिंगापूरची 1.34 टक्के, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीची 1.16 टक्के आणि टीपीजी कॅपिटलची 0.93 टक्के हिस्सेदारी आहे.