Home नाशिक कुंभमेळा Nashik : नाशिकला भारताची आध्यात्मिक राजधानी बनवणार – शेखर सिंह

Nashik : नाशिकला भारताची आध्यात्मिक राजधानी बनवणार – शेखर सिंह

0
Nashik : नाशिकला भारताची आध्यात्मिक राजधानी बनवणार – शेखर सिंह
नाशिकला भारताची आध्यात्मिक राजधानी बनवणार - शेखर सिंह

– सुहास शेलार

इंट्रो – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. यापैकी सुमारे ८५ टक्के कामे कायमस्वरूपी स्वरूपाची असून, त्यांचा लाभ कुंभमेळ्यानंतरही नाशिकला होणार आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन साधूग्रामचा विस्तार, घाटांची क्षमता वाढविणे, पार्किंग आणि सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन, हजारो सीसीटीव्ही कॅमेरे तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित गर्दी व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर गोदावरी स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया, पाणीपुरवठा आणि धार्मिक-ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनावर भर देण्यात आला आहे. या सर्व कामांच्या माध्यमातून नाशिकला देशाच्या आध्यात्मिक नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी, भाविकांच्या सुविधांचे नियोजन आणि नाशिकच्या दीर्घकालीन विकासाविषयी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह (भाप्रसे) यांच्याशी ‘दै. प्रहार’ने साधलेला संवाद.

https://www.prahaar.in/2026/10/22/the-festive-atmosphere-of-diwali-and-chhath-puja-massive-crowds-of-passengers-at-pune-railway-station-special-security-measures-implemented-by-the-administration/

प्रश्न : येत्या ३१ ऑक्टोबरला राष्ट्रपती नाशिकला येत आहेत. या पार्श्वभूमीवर तयारी कोणत्या टप्प्यावर आहे? ध्वजारोहणासह गोदा आरती आणि शंखनादाच्या विश्वविक्रमाचे नियोजन कसे असेल?

शेखर सिंह : सिंहस्थ महाकुंभाची सुरुवात ही गुरु ग्रहाच्या सिंह राशीतील प्रवेशाशी संबंधित आहे. ३१ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजून २ मिनिटांचा मुहूर्त असून, त्या दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी ध्वजारोहणाचा सोहळा होणार आहे. यानिमित्ताने दोन विश्वविक्रम करण्याचाही प्रयत्न आहे. २५ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ५०१ जणांच्या सहभागातून शंखनादाचा विश्वविक्रम करण्याचे नियोजन आहे. मुख्य कार्यक्रमाला सामाजिक सहभागाची जोड देण्याचा प्रयत्न आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६ हजार ५०० आदिवासी पाड्यांमधील जनजातीय बांधव-भगिनींना या सोहळ्याशी जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विविध संस्थांच्या सहकार्याने गोदा आरती आयोजित केली जाणार असून, त्याच्याशी संबंधित विश्वविक्रमाचाही प्रयत्न केला जाईल.

प्रश्न : गोदा आरती कोणी करावी, यावरून काही मतभेद निर्माण झाले होते. आता या विषयावर सहमती झाली आहे का? त्यात प्रशासनाची भूमिका काय असेल?

शेखर सिंह : भारतात विविधता आहे आणि प्रत्येक परंपरेला स्वतःचे महत्त्व आहे. गोदामाईची आरती कोणत्याही संस्थेमार्फत केली गेली, तरी तिचा मूळ उद्देश गोदामाईची स्तुती करणे आणि तिला नमन करणे हाच आहे. पुरोहित संघाला तीर्थपुरोहित म्हणून आरती करण्याची जी परंपरा अनेक दशकांपासून, शतकांपासून लाभली आहे, ती कायम राहणार आहे. त्याबाबत कोणाचेही दुमत नाही. त्याचवेळी गोदातीर्थ आरती समितीसह इतर संस्थाही या उपक्रमात सहभागी होत आहेत. सर्वांशी चर्चा करून, सर्वांना सोबत घेऊन ३१ ऑक्टोबरचा कार्यक्रम पार पाडण्याचे नियोजन आहे. या सोहळ्यात दिव्यता आणि भव्यता कशी साधता येईल, तसेच त्याचा आध्यात्मिक गाभा कसा जपता येईल, यावर सर्वांचे एकमत आहे. मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश मबाजन यांचे सहकार्याने प्रशासन या सोहळ्याची तयारी करत आहे.

प्रश्न : सिंहस्थासाठी कोट्यवधी भाविक, आखाडे आणि संत-महंत नाशिकमध्ये येणार आहेत. त्यांच्या सुविधांसाठी पायाभूत कामे कोणत्या टप्प्यावर आहेत?

शेखर सिंह : सध्या कायमस्वरूपी पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. नाशिक विमानतळ आणि रेल्वे स्थानकांचे उन्नतीकरण, रिंग रोड, शहरांतर्गत रस्ते, त्र्यंबकेश्वरमधील रस्ते, ग्रामीण भागातील रस्ते तसेच राष्ट्रीय महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. विविध यंत्रणांच्या माध्यमातून ही कामे सुरू आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुमारे १२ ते १३ नवीन घाट विकसित केले जात आहेत. त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी प्रयागतीर्थ परिसरात नवीन घाट उभारला जात आहे. त्याची लांबी एका बाजूने सुमारे अडीच किलोमीटर असून, दोन्ही बाजूंचा विचार करता ती सुमारे साडेतीन किलोमीटर होते. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी हा घाट महत्त्वाची भूमिका बजावेल. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामेही सुरू आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. कायमस्वरूपी पायाभूत सुविधांपैकी बहुतांश कामे सध्या मधल्या टप्प्यात किंवा त्यापुढे आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी साधारणतः १ मार्चपर्यंतची मुदत निश्चित केली आहे. काही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे कार्यान्वयन एप्रिल-मेपर्यंत पूर्ण होईल. यासोबतच तात्पुरत्या सुविधांची उभारणीही सुरू झाली आहे. साधूग्राम, पार्किंग, स्वच्छतागृहे, स्वच्छता व्यवस्था आणि सार्वजनिक सुविधा यांचे नियोजन केले जात आहे. शहराचे सुशोभीकरण, साधूग्राममधील विविध सुविधा आणि जागांचे नियोजन यांचाही त्यात समावेश आहे.

प्रश्न : प्रयागराजच्या तुलनेत नाशिकमध्ये उपलब्ध जागा कमी आहे. वाढत्या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी कोणती रणनीती आखली आहे?

शेखर सिंह : प्रयागराज आणि नाशिकच्या भौगोलिक परिस्थितीत फरक आहे. गंगेचे पात्र आणि गोदावरीचे पात्र यांची तुलना करता येत नाही. प्रयागराजमध्ये नदीचे पाणी ओसरल्यानंतर कुंभमेळ्यासाठी सुमारे १० ते १२ हजार एकर जागा उपलब्ध होते. गोदावरीचा उगम ब्रह्मगिरीमध्ये असल्यामुळे नाशिकमध्ये नदीचे पात्र तुलनेने लहान आहे. मागील सिंहस्थात नाशिकमधील साधूग्रामचे क्षेत्र सुमारे ३२० ते ३३० एकर होते. यावेळी ते जवळपास १ हजार ३०० एकरांपर्यंत वाढविण्यात येत आहे. म्हणजेच साधूग्रामचे क्षेत्र जवळपास चौपट करण्यात आले आहे. भाविकांची संख्या मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत चार ते पाच पटींनी वाढण्याचा अंदाज आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही साधूग्रामचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जात आहे. मागील वेळी सुमारे १५ ते २० एकर क्षेत्र असताना यावेळी सुमारे २५० हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात येत आहे. घाटांची लांबी वाढविणे ही गर्दी नियंत्रणाची आणखी एक महत्त्वाची उपाययोजना आहे. यापूर्वी सुमारे साडेसात ते आठ किलोमीटर लांबीचे घाट होते. आता त्यांची एकूण लांबी सुमारे साडेपंधरा ते १६ किलोमीटरपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. स्नानासाठी घाटांवर गर्दीचा दबाव निर्माण होतो. त्यामुळे अधिक घाट उपलब्ध करून भाविकांची विभागणी करता येईल.

वाहतुकीसाठीही मोठ्या प्रमाणावर नियोजन केले आहे. नाशिककडे येणारे नऊ महामार्ग आणि त्र्यंबकेश्वरकडे जाणारे चार प्रवेशमार्ग अशा एकूण १३ प्रवेशबिंदूंवर अंतर्गत आणि बाह्य पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. बाह्य पार्किंगमधून अंतर्गत पार्किंगपर्यंत भाविकांना आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे पाच हजार बस वापरण्याचे नियोजन आहे. नाशिक रोड आणि देवळाली या विद्यमान रेल्वे स्थानकांवरील ताण कमी करण्यासाठी ओढा, कसबे सुकेणे आणि खेरवाडी या तीन स्थानकांचा विकास भारतीय रेल्वेच्या सहकार्याने करण्यात येत आहे. कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांचेही नियोजन आहे. ओढा, कसबे सुकेणे आणि खेरवाडी येथे उत्तर दिशेकडून येणाऱ्या गाड्यांसाठी, तर देवळाली आणि नाशिक रोड येथे दक्षिण दिशेकडून येणाऱ्या गाड्यांसाठी नियोजन केले जात आहे. त्यामुळे सर्व वाहतुकीचा भार दोनच स्थानकांवर येणार नाही.

प्रश्न : घाटांवरील गर्दी, वाहतूक कोंडी आणि गोंधळ टाळण्यासाठी प्रत्यक्ष व्यवस्थापन कसे केले जाणार आहे?

शेखर सिंह : गर्दी नियंत्रणासाठी ‘होल्ड अँड रिलीज’ पद्धतीचा वापर केला जाईल. म्हणजे सर्व भाविकांना एकाच वेळी घाटांवर सोडण्याऐवजी त्यांना आधी होल्डिंग एरियामध्ये थांबविले जाईल. घाटांवरील गर्दी कमी झाल्यानंतर पुढील गटाला सोडण्यात येईल. पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्यासह यासंदर्भात नियोजन केले जात आहे. कुंभमेळ्यासाठी ५० हजारांहून अधिक पोलिसांची तैनाती अपेक्षित आहे. याशिवाय भोसला मिलिटरी अकॅडमीच्या सहकार्याने १५ हजारांहून अधिक स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले आहे. वाहतूक, गर्दी नियंत्रण आणि चेंगराचेंगरी प्रतिबंधासाठी विविध विभागांतील अधिकाऱ्यांचेही प्रशिक्षण घेतले जात आहे. २००३ मध्ये नाशिकमध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रमणी समितीच्या शिफारशींचा अभ्यास करण्यात आला आहे. त्या शिफारशींचा समावेश सध्याच्या नियोजनात केला जात आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी आयआयएम नागपूर, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी तिरुपती या संस्थांचा समावेश असलेला समूहही कार्यरत आहे. वाहनांची आणि पादचाऱ्यांची गर्दी कुठे अडू शकते, कोणत्या ठिकाणी कोंडी होऊ शकते, बॅरिकेडिंग कुठे असावे आणि त्याचा गर्दीच्या प्रवाहावर काय परिणाम होईल, याचे सिम्युलेशन या संस्थांच्या मदतीने केले जात आहे.

तंत्रज्ञानाचा वापर हा नियोजनाचा महत्त्वाचा भाग आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहरांसह घाट, अंतर्गत व बाह्य पार्किंगच्या ठिकाणी पाच हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित १८ उपयोगप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात गर्दीची घनता मोजणे, गर्दीत एखादी व्यक्ती पडल्यास त्याची नोंद घेणे आणि घटना घडल्यास तत्काळ माहिती मिळविणे अशा सुविधांचा समावेश आहे. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘डिजिटल ट्विन’ प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न आहे. त्याद्वारे गर्दीची संभाव्य घनता आणि हालचालींचे पूर्वानुमान करता येईल. घाटांवर गर्दी कशी वाढत आहे, कोणत्या ठिकाणी गर्दीचा दबाव वाढल्यानंतर भाविकांचा प्रवाह थांबवावा, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी या माहितीचा उपयोग होईल.

प्रश्न : कुंभमेळ्याच्या काळात गोदावरीची स्वच्छता आणि साधू-महंतांसह भाविकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत?

शेखर सिंह : गोदावरी स्वच्छतेसाठी नदीच्या उगमापासून काम केले जात आहे. त्र्यंबकेश्वर नगरपरिषद क्षेत्रात दोन टप्प्यांत सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा उभारली जात आहे. प्रत्येक घर सांडपाणी वाहिनीला जोडून ते सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेले जाईल आणि प्रक्रिया केल्यानंतरच नदीत सोडले जाईल. नाले आणि ओढ्यांमधून नदीत जाणारे सांडपाणीही मुख्य यंत्रणेशी जोडण्याचे काम सुरू आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सुमारे ६.५ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहे. नाशिक शहरासाठी ४८६ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जात आहेत. जुलै २०२५ पासून सुरू झालेल्या या मोठ्या प्रकल्पात चार प्रमुख प्रक्रिया केंद्रे आणि काही पंपिंग स्टेशन्सचा समावेश आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या हायब्रिड अॅन्युइटी मॉडेलवर (पीपीपी-एचएएम) आधारित आहे. काम करणाऱ्या संस्थेकडेच पुढील २५ वर्षे देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी असेल. प्रकल्पाचे देयकही ठरविलेल्या परिणामांच्या निकषांशी जोडलेले असेल. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी सांडपाणी वाहून नेणारे जाळे आणि त्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. अमृत योजनेअंतर्गत नाशिकमध्ये ३०० किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या नव्या सांडपाणी वाहिन्या टाकल्या जात आहेत. शहरातील २८ रस्त्यांच्या कामांमध्ये जुन्या वाहिन्यांचे नूतनीकरण आणि कमी व्यासाच्या वाहिन्यांच्या जागी मोठ्या व्यासाच्या वाहिन्या टाकण्याचाही समावेश आहे. शहरातील सुमारे १९ नाले आणि ओढ्यांच्या मुखाशी सांडपाणी अडविण्याची यंत्रणा उभारली जात आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांतील सांडपाणी थेट नदीत जाण्याऐवजी मुख्य वाहिन्यांद्वारे प्रक्रिया केंद्रांपर्यंत पोहोचेल.

पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठीही दीर्घकालीन उपाययोजना केल्या आहेत. मुकणे धरणातील नाशिक महानगरपालिकेसाठी राखीव असलेल्या सुमारे २७४ एमएलडी पाणीपुरवठा क्षमतेचा पूर्ण उपयोग करण्यासाठी सिंहस्थ निधीतून प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. कुंभमेळ्यासाठी त्यातील सुमारे ५० ते ६० एमएलडी पाणी वापरले जाण्याची अपेक्षा आहे; मात्र या प्रकल्पाचा लाभ शहराला पुढील १० ते १५ वर्षांच्या पाण्याच्या गरजांसाठीही होईल. त्र्यंबकेश्वरमध्ये वॉटर ग्रिड प्रकल्पातून सुमारे १०.५ एमएलडी क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही शहरांतील साधूग्राममध्ये पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध राहील, असे नियोजन केले आहे.

प्रश्न : सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकमध्ये सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची कामे होत आहेत. त्यातील किती कामे कायमस्वरूपी असतील? नाशिकला भारताची आध्यात्मिक राजधानी बनवण्याची संकल्पना कशी साकार होईल?

शेखर सिंह : एकूण कामांपैकी सुमारे ८५ टक्के कामे कायमस्वरूपी स्वरूपाची आहेत. रस्ते, महामार्ग, पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया यांसारख्या पायाभूत सुविधांचा त्यात समावेश आहे. उदाहरणार्थ, सिंहस्थासाठी साधूग्राम आणि संबंधित भागांना सुमारे ५० ते ६० एमएलडी सांडपाणी प्रक्रिया क्षमतेची गरज असेल; परंतु नाशिकमध्ये ४८६ एमएलडी क्षमतेचे प्रकल्प उभारले जात आहेत. म्हणजेच पुढील १५ ते २० वर्षांतील शहराची गरज लक्षात घेऊन ही क्षमता निर्माण केली जात आहे. त्याचप्रमाणे सिंहस्थासाठी सुमारे ४० ते ५० एमएलडी पाण्याची गरज असली, तरी मुकणे धरणातील महानगरपालिकेच्या राखीव पाणीपुरवठा क्षमतेचा पूर्ण उपयोग करण्याचे नियोजन आहे. या सुविधांचा लाभ सिंहस्थानंतरही शहराला मिळणार आहे.

नाशिकला आध्यात्मिक राजधानी म्हणून पुढे आणण्यासाठी सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनावरही मोठ्या प्रमाणावर काम केले जात आहे. त्यातील महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘रामकालपथ’. नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून, यूसीएफ आणि राज्य शासनाच्या निधीतून पंचवटी परिसरात हा प्रकल्प राबविला जात आहे. काळाराम मंदिर, सीतागुंफा आणि रामकुंड परिसराचे संवर्धन व विकास करण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये ज्योतिर्लिंग मंदिर परिसरासाठी ‘शिवदर्शन पथ’ विकसित केला जात आहे. भाविकांना दर्शनासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, प्रतीक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणे आणि गर्दीचे नियोजन करणे, यावर भर आहे. तिरुपतीसारख्या तीर्थक्षेत्रांमध्ये भाविकांना प्रतीक्षागृहांत थांबवून नियोजनबद्ध पद्धतीने दर्शनासाठी पाठविले जाते. त्याच धर्तीवर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. नाशिकमधील नारोशंकर मंदिर, सुंदर नारायण मंदिर, अजगरेश्वर बाबा समाधी आणि रामकुंड परिसरातील इतर ऐतिहासिक वास्तूंच्या जीर्णोद्धाराचे काम भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून केले जात आहे. त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थाचा दोन टप्प्यांत जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गायत्री मंदिर आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या संवर्धनाची कामेही सुरू आहेत. याशिवाय त्र्यंबकेश्वर परिसरातील प्रयागतीर्थ, बिल्वतीर्थ आणि इंद्रकुंड यांसह सुमारे सहा कुंडांच्या विकासाचा समावेश आहे.

आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीने नाशिकचे महत्त्व वेगळे आहे. शैव आणि वैष्णव या दोन्ही परंपरांसाठी महत्त्व असलेली ठिकाणे येथे आहेत. बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यात आहे. प्रभू श्रीरामांनी वनवासातील महत्त्वाचा काळ पंचवटीत व्यतीत केला. काळाराम मंदिर आणि पंचवटीच्या माध्यमातून या वारशाचे दर्शन घडते. याशिवाय वणी येथील सप्तशृंगी गड, सिन्नरमधील गोंदेश्वर मंदिर, अंजनेरी आणि ब्रह्मगिरी यांसारख्या स्थळांनाही महत्त्व आहे. अंजनेरी आणि ब्रह्मगिरीच्या विकासाची कामे सिंहस्थ निधीतून वन विभागाच्या माध्यमातून केली जात आहेत. सिंहस्थाच्या आधी आणि नंतर ही कामे पूर्ण झाल्यावर नाशिकला आध्यात्मिक पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळक स्थान मिळेल. राज्यापुरतेच नव्हे, तर देशातील प्रमुख आध्यात्मिक केंद्रांपैकी एक म्हणून नाशिकला पुढे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाशिकला भारताची आध्यात्मिक राजधानी म्हणून विकसित करण्याची संकल्पना याच व्यापक नियोजनाचा भाग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here