International News: भारताच्या सीमेलगत असलेल्या तिबेटमध्ये भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. 7.0 तीव्रतेच्या या भूकंपात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून, 32 हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. भूकंपामुळे 300 हून अधिक घरं कोसळली असून अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर आपत्कालीन यंत्रणा सक्रिय झाली असून, प्रभावित भागात बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत
चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री 10 वाजून 33 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्यांमुळे अनेक घरांचे नुकसान झाले. काही भागांमध्ये वीजपुरवठा आणि दूरसंचार सेवाही विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे.
शुक्रवारी पहाटे 2 वाजून 25 मिनिटांपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 32 जण जखमी झाले होते. त्यापैकी 11 जणांची प्रकृती गंभीर होती, तर 21 जणांना किरकोळ दुखापत झाली होती. भूकंपानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध बचाव पथकांकडून घेतला जात आहे.
JUST IN: At least 16 dead, 32 injured and hundreds of homes collapsed after a magnitude 7.0 earthquake struck Tibet, China, officials say. https://t.co/2nTZ5BL4CU
— Scope Report (@ScopeReport_) October 22, 2026
नागचू परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू
या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर तिबेटमधील नागचू परिसरातील बाचेन काउंटीच्या मारू टाउनशिपमध्ये असल्याची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेनुसार (USGS), हा भाग नागचूपासून सुमारे 190 किलोमीटर पूर्व-ईशान्येला आणि तिबेटची प्रादेशिक राजधानी ल्हासापासून सुमारे 390 किलोमीटर ईशान्येला आहे.
चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटरच्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता. हा परिसर पर्वतीय आणि समुद्रसपाटीपासून उंचीवर असल्याने बचावकार्य करताना अडचणी येण्याची शक्यता आहे.
बचावकार्य सुरू; नुकसानीचा आढावा
भूकंपानंतर आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली असून, जखमींना मदत आणि प्रभावित भागातील परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. कोसळलेल्या घरांमुळे झालेल्या नुकसानीची व्याप्ती आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांची संभाव्य संख्या याबाबत अधिकाऱ्यांकडून तपास केला जात आहे.
दरम्यान, या भूकंपामुळे तिबेटमधील जनजीवनावर परिणाम झाला असून, बचावकार्य आणि मदतकार्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.