भारतीय संघाचा धडाकेबाज कसोटी सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने वयाच्या 24 व्या वर्षी यष्टीरक्षणाची (Wicketkeeping) भूमिका स्वीकारण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली. आगामी रणजी करंडक आणि न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी जयस्वालने फलंदाजी आणि लेगस्पिनसह यष्टीरक्षणाचा सराव केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, भारताचे माजी सलामीवीर आणि मुंबईचे दिग्गज फलंदाज वसीम जाफर यांनी जैस्वालच्या या निर्णयावर कडक शब्दांत आक्षेप घेतला आहे.
काय म्हणाले वसीम जाफर?
आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर बोलताना वसीम जाफर यांनी आश्चर्य व्यक्त करत या प्रकारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, “जेव्हा मी हे ऐकले तेव्हा मला स्वतःला खूप आश्चर्य वाटले. जर तुम्ही लहानपणापासून यष्टीरक्षण केले नसेल, तर ही भूमिका पार पाडणे अत्यंत अवघड असते. कसोटी क्रिकेटमध्ये हे काम अत्यंत आव्हानात्मक असून योग्य पायाशिवाय यात जुळवून घेणे कठीण जाईल. एका रात्रीत हे कौशल्य विकसित करणे शक्य नाही, त्यामुळे हा प्रकार मला एका विनोदासारखा वाटतो.”
संघामध्ये आधीच तज्ज्ञ यष्टीरक्षक उपलब्ध
यशस्वी जयस्वाल मर्यादित षटकांच्या (व्हाइट-बॉल) संघात स्थान मिळवण्यासाठी घाई करत असल्याचे दिसून येत आहे, असे मत जाफर यांनी मांडले. यावर भाष्य करताना ते पुढे म्हणाले, “भारतीय संघात आधीपासूनच ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि इशान किशन यांसारखे दर्जेदार आणि तज्ज्ञ यष्टीरक्षक उपलब्ध आहेत. अशा स्थितीत जयस्वालने या क्षेत्रात उतरण्याचा विचार करणे योग्य नाही. त्याने इतर गोष्टींचा विचार करण्याऐवजी आगामी रणजी करंडक स्पर्धा आणि न्यूझीलंड दौऱ्याच्या दृष्टीने केवळ आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”
https://www.prahaar.in/2026/10/12/naman-dhir-has-achieved-the-feat-of-taking-a-wicket-on-the-very-next-ball-after-hitting-a-six-in-the-three-t20-matches/
मुंबईच्या कर्णधाराचा खुलासा
रणजी स्पर्धेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबईचा कर्णधार सिद्धेश लाड याने स्पष्ट केले होते की, जयस्वाल सरावादरम्यान काही षटके यष्टीरक्षण करताना दिसला असून तो स्वतःच्या खेळात एक नवीन कौशल्य जोडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या मुख्य कसोटी ओव्हररने अशा प्रकारे अचानक वेगळी भूमिका स्वीकारणे किती योग्य ठरेल, याबद्दल आता क्रिकेट विश्वात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.