Home ब्रेकिंग न्यूज हा विजय म्हणजे सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची मोठी जबाबदारी – सहकारी कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानंतर सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला विश्वास

हा विजय म्हणजे सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची मोठी जबाबदारी – सहकारी कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानंतर सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला विश्वास

0
हा विजय म्हणजे सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची मोठी जबाबदारी – सहकारी कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानंतर सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला विश्वास

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व २१ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटालाही जोरदार धक्का दिला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरून मिळविलेला हा विजय बारामतीतील राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’वर विश्वास दाखवून भरघोस विजय मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सर्व सभासद मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले असून, सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. अजित पवारांनी तब्बल ३४ वर्षे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विकासासाठी योगदान दिले. कारखान्याशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे नाते, सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी पाहिलेली स्वप्ने आणि सहकार क्षेत्रात त्यांनी जपलेला वारसा यांचे स्मरण या विजयाच्या निमित्ताने होत आहे. दादांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करत त्यांची स्वप्ने पूर्ण करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

या निवडणुकीत सभासद शेतकरी बांधव-भगिनींनी दाखवलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत हीच आमची ताकद आहे. सर्वांना सोबत घेऊन सभासदांचे हित जपणे, शेतकऱ्यांची समृद्धी साधणे आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची प्रगती अधिक गतिमान करणे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली. हा विजय केवळ आनंदाचा क्षण नसून, सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची मोठी जबाबदारी आहे. सभासद शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत कारखान्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणे, हेच आमचे ध्येय राहील असा शब्द सुनेत्रा पवार यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here