Home महाराष्ट्र नाशिक Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीला वेग, 21 ऑक्टोबरपर्यंत नावे सादर करण्याची मुदत

Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीला वेग, 21 ऑक्टोबरपर्यंत नावे सादर करण्याची मुदत

0
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीला वेग, 21 ऑक्टोबरपर्यंत नावे सादर करण्याची मुदत

Nashik : नाशिक महापालिका (Nashik Municipal Corporation) निवडणुकीनंतर तब्बल नऊ महिन्यांपासून रखडलेल्या दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्ती प्रक्रियेला अखेर वेग आला आहे. उच्च न्यायालयाने (High Court) २९ सप्टेंबर रोजी नियुक्ती प्रक्रिया सहा आठवड्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री (Municipal Commissioner Manisha Khatri) यांच्या उपस्थितीत सोमवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक पार पडली.

या बैठकीत संबंधित पक्षांनी त्यांच्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या उमेदवारांची नावे २१ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली. पक्षांकडून नावे प्राप्त झाल्यानंतर संबंधित उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर उमेदवारांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि निर्धारित निकषांची छाननी केली जाईल. छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी निश्चित करून त्यांची नावे महासभेत जाहीर केली जाणार आहेत.

भाजपला सहा, शिंदे गटाला दोन जागा

महापालिकेतील विद्यमान पक्षीय संख्याबळानुसार दहा स्वीकृत नगरसेवकांच्या जागांपैकी भाजपच्या वाट्याला सहा जागा येणार आहेत. शिवसेना शिंदे गटाला दोन, तर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस गटाला प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. या दहा जागांसाठी विविध पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारांची निवड करणे हे पक्षांच्या गटनेत्यांसाठी आव्हान ठरणार आहे. नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाल्याने इच्छुकांच्या भेटीगाठी आणि पक्षांतर्गत राजकीय हालचालींनाही आता वेग येण्याची शक्यता आहे. बैठकीला भाजपचे गटनेते अॅड. श्याम बडोदे, शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अजय बोरस्ते, शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सीमा ठाकरे उपस्थित होत्या.

https://www.prahaar.in/2026/10/06/nashik-maharashtras-first-grain-atm-to-launch-soon-in-nashik-ration-available-24-7/

अंतिम चित्र अर्ज दाखल झाल्यानंतरच स्पष्ट होणार

सभापती आणि उपसभापतीपदासाठी मंगळवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. महापालिकेतील संख्याबळ पाहता पाचही समित्यांची सभापतीपदे भाजपकडे राहतील आणि निवड बिनविरोध होईल, अशी चर्चा होती. मात्र, सत्तेतील मित्रपक्षांना प्रतिनिधित्व देण्यासाठी दोन सभापतीपदे मित्रपक्षांना देण्याचा निर्णय झाल्याचे समजते. यामध्ये शहर सुधार समिती तसेच वैद्यकीय व आरोग्य समिती या दोन समित्यांचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबतचे अंतिम चित्र अर्ज दाखल झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीपासून ते विषय समित्यांच्या पदवाटपापर्यंत महापालिकेतील राजकीय हालचालींना आता वेग आला असून, आगामी काळात कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्यांना संधी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here