Home ब्रेकिंग न्यूज अन्न व औषध प्रशासनाची राज्यव्यापी धडक कारवाई; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधींचा अस्वच्छ व असुरक्षित अन्नसाठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची राज्यव्यापी धडक कारवाई; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधींचा अस्वच्छ व असुरक्षित अन्नसाठा जप्त

0
अन्न व औषध प्रशासनाची राज्यव्यापी धडक कारवाई; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधींचा अस्वच्छ व असुरक्षित अन्नसाठा जप्त
फोटो सौजन्य: AI Generated

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिक आणि आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात मोठी धडक कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेत मिठाई, चीज, तूप, पनीर, दूध, बदाम, स्किम्ड मिल्क पावडर, खाद्यतेले आणि गुटख्यासारख्या प्रतिबंधित पदार्थांसह सुमारे 3,902.20 किलोग्राम अन्नपदार्थ आणि 617 लिटर दूध जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या या संपूर्ण साठ्याची किंमत अंदाजे 16.22 लाख रुपये इतकी आहे. तसेच अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील एकूण 31 अन्न आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.(FDA Maharashtra)

प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्यावर कठोर कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या विभागांमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण 19 आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 18 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळले.

  • या धडक कारवाईत एकूण 67,66,717 रुपयांचा मुद्देमाल (प्रतिबंधित साठा आणि 2 वाहने) जप्त करण्यात आला.

  • संबंधित 14 आस्थापनांविरुद्ध गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले असून 18 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 13 आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.

नामांकित हॉटेल, बेकरी आणि डार्क स्टोअर्सचे परवाने निलंबित

मुंबई, कोकण, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतील अनेक नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेबरीज आणि डार्क स्टोअर्समध्ये अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन आढळल्याने कठोर कारवाई करण्यात आली आहे:

  • मुंबई विभाग (12 आस्थापना): अन्नदाता आहार केंद्र (खार), न्यू इंग्लिश बेकरी (गिरगाव), सेंट फिलोमेना बेकरी (माझगाव), ब्लिंक कॉमर्स प्रा. लि. (सायन कोळीवाडा व शिवडी), राधा कृष्ण उपाहारगृह (बोरिवली), सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस (कुर्ला), पी. आर. जेना केटरर्स (बीकेसी), शताब्दी रुग्णालय उपाहारगृह (गोवंडी), तसेच फेव्हरेट टेकअवे, स्विन्स्टा एंटरप्रायझेस आणि कोहिनूर हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट (दादर) यांसारख्या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. येथे अन्न तयार करण्याच्या जागेत पाणी साचणे, मुंग्या, झुरळे आणि घरमाश्यांचा प्रादुर्भाव, तसेच कामगारांची वैद्यकीय तपासणी नसणे यांसारख्या गंभीर त्रुटी आढळल्या.(FDA Maharashtra)

  • कोकण विभाग (12 आस्थापना): ठाणे, रायगड परिसरातील मॅक्सॉइल एंटरप्रायझेशन्स, हैदराबाद हाऊस (ठाणे), प्रतिश एंटरप्रायझेस, जय भारत रेस्टॉरंट, नीलकमल बेकरी, गुलिस्तान फॅमिली रेस्टॉरंट (मुंब्रा), तसेच क्युलीनरी ब्रँड्स इंडिया (SUBWAY, खालापूर) यांसारख्या आस्थापनांचे परवाने अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे निलंबित करण्यात आले.

  • पुणे विभाग (06 आस्थापना): साई प्रसाद व्हेज, मानस फॅमिली रेस्टो अँड लाउंज (शिवाजीनगर), हॉटेल मलाज, शिवर्श वेज रेस्टॉरंट (वारजे), हॉटेल राजपुत (शिरूर) आणि जे.के. चायनीज (बारामती) या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

  • छत्रपती संभाजीनगर विभाग: कैज (जि. बीड) येथील हॉटेल समर्थचा परवाना शेड्युल 4 मधील स्वच्छता निकषांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आला.

https://www.prahaar.in/2026/10/01/diveagar-beach-pune-8-students-drown-death/

विविध जिल्ह्यांत बोगस व निकृष्ट अन्नसाठा जप्त

  • पुणे: उरुळी देवाची येथे ‘अमुल’च्या नावाखाली 430 किलो बनावट चीज (किंमत सुमारे 12,57,164 रुपये) जप्त करण्यात आला. तसेच पाडियन प्रोडक्ट्स, लखेश्वर डेअरी आणि मोरबीवाला स्वीट्स अँड नमकीन येथून निकृष्ट दर्जाचे आणि चुकीच्या लेबलिंगचे पदार्थ हस्तगत करण्यात आले.

  • बीड: मे. ढोले फूड प्रोडक्ट्स (वडवणी) नवीन जागेत विनापरवाना उत्पादन करत असल्याचे निष्पन्न झाल्याने परवाना रद्द करून 1,17,460 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

  • अहिल्यानगर: प्रशासनाने केलेल्या कारवाईत 2,398 किलोग्राम स्किम्ड मिल्क पावडर (किंमत सुमारे 5,27,560 रुपये) जप्त केली.

  • ठाणे व रायगड: दूध विक्री केंद्रांवर केलेल्या तपासणीत विनालेबल आणि संशयित कमी दर्जाचे सैल दूध जप्त करण्यात आले.(FDA Maharashtra)

  • सांगली व नागपूर विभाग: सांगलीत तूप व क्रीम, तर नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा येथे अस्वच्छ परिस्थितीत साठवलेले खाद्यतेल, काजू, ओवा, खवा आणि लाई जप्त करण्यात आली.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही आस्थापनाची कसलीही हमी घेतली जाणार नाही आणि यापुढेही अशीच कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील, असा इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here