Home गणेशोत्सव Ganeshotsav 2026 : लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांच्या दोन स्कूटर्स चोरीला; काळाचौकी पोलिसांत गुन्हे दाखल

Ganeshotsav 2026 : लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांच्या दोन स्कूटर्स चोरीला; काळाचौकी पोलिसांत गुन्हे दाखल

0
Ganeshotsav 2026 : लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांच्या दोन स्कूटर्स चोरीला; काळाचौकी पोलिसांत गुन्हे दाखल
Lalbuagcha Raja 2026 (2)

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या (Lalbuagcha Raja) दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन भाविकांच्या स्कूटर्स पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काळाचौकी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या दोन्ही घटनांमध्ये, दर्शनावरून परतल्यानंतर भाविकांना त्यांच्या गाडीची चावी खिशात नसल्याचे लक्षात आले आणि पार्किंगच्या ठिकाणी जाऊन पाहताच गाड्या गायब झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

पहिली घटना : सेवासदन इमारतीबाहेरून होंडा डिओ चोरीला

पहिली घटना २२ सप्टेंबरच्या रात्री घडली. वैभव विजय सोनार हे त्यांच्या मित्रासोबत लालबाग परिसरात दर्शनासाठी आले होते. त्यांनी बी. आर. आंबेडकर मार्गावरील सेवासदन इमारतीबाहेर आपली ‘होंडा डिओ १२५’ स्कूटर पार्क केली आणि चिंतामणी गणपती व लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिले. पहाटे सुमारे ३:३० वाजता दर्शन घेऊन वैभव परत आले असता, त्यांना खिशात गाडीची चावी नसल्याचे आढळले. त्यांनी मित्राला पार्किंगच्या जागी जाऊन पाहण्यास सांगितले, तर तेथून स्कूटर गायब झाली होती. परिसरात शोधाशोध केल्यानंतर आणि वाहतूक पोलिसांकडे चौकशी केल्यानंतर गाडी चोरीला गेल्याची त्यांची खात्री पटली. चोरीला गेलेल्या या स्कूटरची किंमत सुमारे ७० हजार रुपये आहे.

दुसरी घटना : पोस्ट ऑफिसबाहेरून सुझुकी ॲक्सेस लांबवली

अशीच दुसरी घटना २१ सप्टेंबरच्या रात्री घडली. ऐरण बाळकृष्ण गावडे हे आपल्या मित्रांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी जी. डी. आंबेडकर मार्गावरील पोस्ट ऑफिसबाहेर आपली ‘सुझुकी ॲक्सेस १२५’ (क्रमांक MH 01 JK 2198) पार्क केली आणि ते दर्शनासाठी निघून गेले. रात्री सुमारे १ वाजता दर्शन घेऊन परतल्यावर ऐरण यांच्याही खिशात गाडीची चावी नव्हती. त्यांच्या मित्राने पार्किंगच्या ठिकाणी जाऊन पाहिले असता गाडी तेथे नव्हती. आजूबाजूला खूप शोध घेऊनही गाडी न सापडल्याने त्यांनी काळाचौकी पोलिसांत तक्रार दाखल केली. या गाडीची किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

चावी गाडीतच राहिल्याचा संशय

तक्रारीनुसार, दोन्ही घटनांमध्ये गाड्यांची चावी वाहनातच विसरल्याचा किंवा राहून गेल्याचा अंदाज आहे, ज्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. सध्या काळाचौकी पोलीस परिसरातील परिस्थिती आणि सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत असून अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात लालबाग परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्याने नागरिकांनी आपल्या वाहनांची आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here