Home ब्रेकिंग न्यूज Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसाचा जागीच मृत्यू

Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसाचा जागीच मृत्यू

0
Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसाचा जागीच मृत्यू

पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उरुळी कांचन पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असलेले गणेश रतन दाभाडे (वय 49) यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. शुक्रवारी (18 सप्टेंबर) मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर, ग्रीन पार्क हॉटेलजवळ ही घटना घडली. (Pune Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश दाभाडे हे पोलीस ठाण्यातील काम आटोपून बाहेर पडले होते. त्यानंतर ते पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दाभाडे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. (Pune Solapur Accident)

अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावर न थांबता वाहनासह पसार झाला. त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा आणि चालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

https://www.prahaar.in/2026/09/20/encounter-with-police-in-varanasi-jharkhand-naxal-commander-with-%e2%82%b925-lakh-bounty-killed/

गणेश दाभाडे हे मूळचे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील रहिवासी होते. 2001 मध्ये त्यांनी पोलीस दलात प्रवेश केला होता. पुणे ग्रामीण पोलीस दलात विविध ठिकाणी सेवा बजावल्यानंतर ते उरुळी कांचन पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते. कर्तव्य बजावल्यानंतर घरी जात असताना झालेल्या या अपघातामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

दाभाडे यांच्या निधनाची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आणि परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर शिंदखेडा येथील मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून, अपघाताचा तपास वेगाने सुरू असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, उरुळी कांचन परिसरातील पुणे-सोलापूर महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अपघातप्रवण ठिकाणी पुरेशी प्रकाशयोजना, वेग नियंत्रणाची व्यवस्था, सुरक्षित पादचारी मार्ग आणि वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here