वाशिम : वाशिम जिल्ह्यातील रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या शासकीय कार्यालयातील ‘सिनेमॅटिक रील’ प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणानंतर त्यांच्या प्रशासकीय कामकाजाची विशेष पथकामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ( Washim News)
रिल शूट केलं अन् सोशल मीडियावर रंगल्या चर्चा
प्रतीक्षा तेजनकर यांनी तहसील कार्यालयात शासकीय खुर्चीवर बसून तसेच फायलींवर स्वाक्षरी करताना रीलचे चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. ही रील सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर या प्रकारावरून वाद निर्माण झाला. शासकीय कार्यालय आणि पदाचा वापर वैयक्तिक सोशल मीडिया कंटेंटसाठी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. ( Risod Tehsildar)
https://www.prahaar.in/2026/09/16/cbi-investigation-into-the-disha-salian-case-is-underway-the-roles-of-several-individuals-including-aaditya-thackeray-will-be-examined-and-a-major-responsibility-has-been-entrusted-to-seema-pahuja/
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महसूल व वन विभागाने अमरावती विभागीय आयुक्तांना निर्देश दिल्याचे वृत्त आहे. तेजनकर यांच्या रिसोड तहसीलदार पदावरील संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची विशेष पथकामार्फत तपासणी करून अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील पुढील कारवाईबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. ( Revenue Department)
दरम्यान, या रीलमुळे शासकीय अधिकारी सोशल मीडियाचा वापर कोणत्या पद्धतीने करतात, यावरही चर्चा सुरू झाली आहे. शासकीय पद, कार्यालय किंवा शासकीय साधनांचा वापर सोशल मीडिया कंटेंटसाठी करण्याबाबत असलेल्या नियमांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे पाहिले जात आहे.( Government Office)
तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर या सध्या रिसोडच्या तहसीलदार म्हणून कार्यरत असल्याची माहिती वाशिम जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.